news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी पालिकेचे महाप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सरसावले! अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

पिंपरी पालिकेचे महाप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सरसावले! अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलामुळे पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणीकरांची वाहतूक कोंडी फुटणार; कामात कसूर न ठेवण्याचे अभियंत्यांना आदेश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरीतील नवीन प्रशासकीय इमारत आणि डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडून पाहणी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत तसेच डेअरी फार्म उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत येणारी पावसाळ्यापूर्वीची सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. विशेषतः प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि पाणी निचरा व्यवस्था आदी कामे पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जावा. याशिवाय, दोन्ही प्रकल्पांच्या कामांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्यात यावा. आवश्यक अंदाजपत्रकीय तरतुदींसाठी सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची तत्काळ पूर्तता करून कामाला गती द्यावी,” असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी आज पिंपरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची तसेच डेअरी फार्म परिसरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

या पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता विजय भोजने, संध्या वाघ तसेच उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले की, नवीन प्रशासकीय इमारत हा महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्यातील प्रशासन अधिक सक्षम करणारा प्रकल्प आहे. या भव्य इमारतीमुळे महापालिकेची विविध विखुरलेली कार्यालये एकाच छताखाली येणार असून नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि सर्वसमावेशक आधुनिक सेवा उपलब्ध होतील. त्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता संपूर्ण कामे नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावीत.

डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हा पूल पूर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या परिसरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल. त्यामुळे या प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक समन्वयाने कार्य करावे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांना प्राधान्य द्यावे.

प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेताना अतिरिक्त आयुक्तांनी उर्वरित कामांसाठी आवश्यक असणाऱ्या अंदाजपत्रकीय तरतुदी, प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची तत्काळ पूर्तता करण्याचे आदेश दिले. तसेच दोन्ही प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर १५ दिवसांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर तसेच कार्यकारी अभियंता विजय भोजने आणि संध्या वाघ यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती, आवश्यक तांत्रिक बाबी, प्रकल्पांची वैशिष्ट्ये, आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांचा प्रगती आढावा तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियोजनाबाबतची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना दिली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!