अखेर पाच महिन्यांनंतर काँग्रेसला शहराध्यक्ष मिळाला; वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्याकडे पिंपरी-चिंचवडची धुरा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २१ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: मागील पाच महिन्यांपासून नेतृत्वाविना रखडलेल्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला अखेर नवा शहराध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत, सक्षम संघटक आणि शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र रामदास बनसोडे यांची पिंपरी-चिंचवड काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) वतीने या संदर्भातील अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे. तत्कालीन शहराध्यक्ष कैलास कदम यांनी निवडणुकीच्या ऐन धामधुमीत राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. नरेंद्र बनसोडे यांच्या निवडीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात सध्या काँग्रेसचा एकही नगरसेवक नसताना आणि संघटनात्मक पातळीवर मोठे आव्हान असताना, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची आणि गटबाजी संपवून मरगळ झटकण्याची मोठी जबाबदारी आता नवनियुक्त शहराध्यक्ष बनसोडे यांच्या खांद्यावर असणार आहे.
सामान्य कुटुंबातून आणि तळागाळातील कार्यकर्त्यापासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करून निष्ठेच्या जोरावर काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च स्थानिक पदापर्यंत पोहोचलेले खंबीर नेतृत्व म्हणून नरेंद्र बनसोडे यांची ओळख आहे.
सन २००२ मध्ये त्यांनी ‘एनएसयूआय’ (NSUI) या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून आपल्या राजकीय आणि सामाजिक कारवायीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या धडाडीच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना २००५ ते २००८ या काळात ‘महाराष्ट्र राज्य एनएसयूआय’चे सरचिटणीसपद दिले. त्यानंतर त्यांनी मावळ लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही अत्यंत समर्थपणे काम पाहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांच्या याच प्रदीर्घ निष्ठेचा आणि संघटन कौशल्याचा आदर राखत पक्षाने आता त्यांची शहराध्यक्षपदी बढती केली आहे.
नरेंद्र बनसोडे हे केवळ एक आक्रमक राजकारणी नसून ते एक संवेदनशील समाजसेवकही आहेत. ‘जाणता मंच’ या नामांकित सामाजिक संस्थेच्या (NGO) माध्यमातून त्यांनी शहरातील अनेक गोरगरीब आणि कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. काँग्रेस पक्षाचे ‘चलो पंचायत अभियान’ असो किंवा शहरात अवघ्या ५५ दिवसांत तब्बल १०,५०० हून अधिक ‘युवा शक्ती कार्ड्सचे’ केलेले विक्रमी नोंदणीकरण असो, त्यांच्या कामाची गती आणि जनसंपर्क नेहमीच थक्क करणारा राहिला आहे. आजवर त्यांनी ८० हून अधिक जाहीर सभांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे व तरुणांचे ज्वलंत प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत.
आजच्या बदलत्या राजकीय समीकरणात नरेंद्र बनसोडे हे पिंपरी-चिंचवडमधील एक उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे बी.कॉम. (B.Com), एम.एस.डब्ल्यू. (MSW – मास्टर ऑफ सोशल वर्क) आणि एम.ए. (पाली आणि बौद्ध अभ्यास) पर्यंतचे उच्च शिक्षण त्यांच्या विचारांची प्रगल्भता आणि सामाजिक जाणिवा स्पष्ट करते. याव्यतिरिक्त, ‘एम्फी’ (AMFI) नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक म्हणून आपली व्यावसायिक कार्यक्षमता सांभाळत असतानाच, त्यांनी राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये कधीही तडजोड केली नाही.
आपल्या या सर्वोच्च निवडीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानताना नवनियुक्त शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने दाखवलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन, समाजाची निष्ठेने सेवा करणे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पुरोगामी विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. देशातील घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी व अस्तित्वासाठी मी सदैव रस्त्यावर उतरून लढण्यास तत्पर राहीन.”
नरेंद्र बनसोडे यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल पिंपरी-चिंचवडसह मावळ आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेसला सुवर्णकाळ येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
