दुबई अन् बँकॉकहून भारतात कोट्यवधींचा सायबर डल्ला मारणारा आंतरराष्ट्रीय मास्टरमाईंड जेरबंद! पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , १३ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलीस स्टेशनने एका अत्यंत मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा (International Cyber Crime Syndicate) पर्दाफाश करत थेट थायलंडमधील बँकॉक येथून मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे. दुबई आणि बँकॉक येथून भारतामध्ये कोट्यवधी रुपयांची सायबर फसणूक करणाऱ्या या रॅकेटच्या मुख्य आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) आणि लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले होते. या तांत्रिक आणि आंतरराष्ट्रीय समन्वयाच्या बळावर आरोपीला बँकॉक विमानतळावर ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले असून, त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.
या धडक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बसून भारतीय नागरिकांची कोट्यवधी रुपयांना लूट करणाऱ्या सायबर टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याच्यावर पिंपरी-चिंचवड हद्दीत खालील तीन अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत:
१) देहूरोड पोलीस ठाणे (गु. र. नं. २९३/२०२४): ऑनलाईन टास्क स्कॅम (Online Task Scam) द्वारे नागरिकांची मोठी फसवणूक. या गुन्ह्यात पोलिसांनी जून २०२४ मध्ये एकूण १३ आरोपींना अटक केली होती. अटक आरोपींपैकी दीपक गाडे याने कसून चौकशीत सांगितले होते की, त्याने दुबई येथे जाऊन सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याची भेट घेतली होती. २) हिंजवडी पोलीस ठाणे (गु. र. नं. ७७०/२०२४): शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक. ३) सायबर पोलीस ठाणे (गु. र. नं. १२/२०२५): शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉडद्वारे तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण स्वामी यांनी केलेल्या अत्यंत क्लिष्ट तांत्रिक तपासामध्ये या आंतरराष्ट्रीय रॅकेटची धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी गणेश काळे हा भारतातील वेगवेगळ्या गरीब व सामान्य व्यक्तींकडून त्यांची बँक खाती (Mule Accounts) विकत घेत असे. यामध्ये त्यांचे एटीएम कार्ड, चेकबुक, बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड स्वतःकडे मिळवायचा. सायबर गुन्ह्यांमधून गोळा झालेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा सुरक्षितपणे वळवण्यासाठी (मनी लाँड्रिंग) या बँक खात्यांचा वापर केला जात होता. या बदल्यात खातेधारकांना किरकोळ कमिशन दिले जात असे. मुख्य आरोपी गणेश काळे हा थेट चीन (China) आणि इतर विविध परदेशी नागरिकांच्या संपर्कात होता. त्यांच्या मदतीने तो भारतीय नागरिकांना ‘टास्क फ्रॉड’ (Task Fraud), ‘शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’ (Share Market Investment Fraud) आणि ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) अशा विविध क्लृप्त्या वापरून लुटत होता आणि अफाट आर्थिक नफा मिळवत होता. त्याने आपले मुख्य कार्यालय थेट दुबई येथे सुरू केले होते.
या गुन्ह्यांमध्ये भक्कम पुरावे मिळाल्यानंतर आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे आरोपीच्या तात्पुरत्या अटकेचा व प्रत्यार्पणाचा (Extradition) प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावावर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबई एम्बसी येथे कायदेशीर कारवाई सुरू झाली.
कारवाई सुरू झाल्याचे समजताच सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपी गणेश काळे हा दुबई सोडून बँकॉक (थायलंड) येथे पळून गेला. याची खात्रीशीर माहिती मिळताच सायबर पोलिसांनी अत्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आरोपीविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ आणि ‘लुकआऊट सर्क्युलर’ जारी करून घेतले.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयातून, आरोपी गणेश काळे हा थायलंडमधून दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला कायदेशीर प्रक्रियेद्वारे भारतात आणण्यात आले.
दिनांक ११ जून २०२६ रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण स्वामी, पोलीस अंमलदार हेमंत खरात आणि नितेश बिचेवार यांच्या धाडसी पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले. आरोपीला देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले असून, पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत आहेत.
आरोपी गणेश काळे याच्या अटकेमुळे देशातील इतरही अनेक हायप्रोफाईल गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यात खालील गुन्ह्यांचा समावेश आहे: १) नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई (गु. र. नं. १२/२०२५) २) मालवणी पोलीस ठाणे, मुंबई (गु. र. नं. ०१३२/२०२४) ३) सायबरबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा राज्य (गु. र. नं. १२९४/२०२४) ४) सायबरबाद पोलीस स्टेशन, तेलंगणा राज्य (गु. र. नं. १५६२/२०२४)
सदरची उल्लेखनीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील धडाकेबाज कामगिरी पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. रोहिदास पवार, तत्कालीन पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप डोईफोडे, तत्कालीन पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच या यशस्वी कारवाईत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) सागर पठाण, पोलीस अंमलदार दीपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे आणि पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने अहोरात्र मेहनत घेऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

