पिंपळे सौदागरमध्ये बसथांब्यांचे विद्रुपीकरण; पीएमपीएमएल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक: २७ जून २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पिंपळे सौदागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसथांब्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्रवाशांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. या बसथांब्यावर बस येण्या-जाण्याचे कोणतेही वेळापत्रक उपलब्ध नसल्याने हा थांबा सध्या पूर्णपणे ‘रामभरोसे’ चालला असल्याचा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी बसथांब्यावर बेकायदेशीर भित्तीपत्रके आणि जाहिराती चिकटवून परिसराचे मोठ्या प्रमाणावर विद्रुपीकरण केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकाराकडे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. अशा बेकायदेशीर जाहिरातींमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असतानाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पुणे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी किमान या ठिकाणी बस येण्या-जाण्याचे वेळापत्रक तरी तातडीने लावावे, त्यांनी तेवढी जरी जाणीव ठेवली तरी पुष्कळ होईल,” अशी घणाघाती टीका प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.
महापालिकेचा महसूल बुडतोय; आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष पिंपरी चिंचवड शहरातील केवळ याच नव्हे, तर अनेक बसथांब्यांवर अशाच प्रकारे बेकायदेशीर जाहिरात फलक आणि स्टिकर्स लावले जात आहेत. यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आकाशचिन्ह परवाना विभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महापालिकेचा हक्काचा महसूल बुडत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पीएमपीएल प्रशासनाने स्वतः जातीने लक्ष घालून शहरातील बसथांब्यांच्या या दुरावस्थेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी तात्काळ पत्रव्यवहार करावा आणि हे प्रश्न सोडवावेत, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदीप गायकवाड (शहराध्यक्ष, अर्बन सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कै. अजितदादा पवार) यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रदीप गायकवाड यांच्या भूमिकेकडे आणि पीएमपीएमएल प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
