रायगडावर शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांची उपस्थिती
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक: २७ जून २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक किल्ले रायगडावर अत्यंत उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सुवर्ण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी विशेष उपस्थिती लावून भगवा ध्वज फडकवला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन केले.
रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांच्या वतीने तिथीनुसार या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह राज्यभरातून आलेले हजारो शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोवाडे, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण रायगड किल्ला दुमदुमून गेला होता.
या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी बोलताना पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा केवळ एक ऐतिहासिक सोहळा नसून स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा तो एक प्रेरणादायी आदर्श आहे. रायगड किल्ला हे प्रत्येक शिवभक्तासाठी ऊर्जा देणारे प्रेरणास्थान असून, येथे येऊन शिवरायांच्या दैदिप्यमान कार्याला अभिवादन करण्याचे भाग्य लाभणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिवरायांनी दिलेला शौर्य, पराक्रम, न्याय आणि सर्वसमावेशक प्रशासनाचा पवित्र वारसा पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
या सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे आणि पालखीचे पूजन करण्यात आले. शिवभक्तांचा अभूतपूर्व उत्साह आणि प्रशासकीय नियोजन यामुळे हा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा पार पडला.
या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरतशेठ गोगावले, योगेश कदम, महापौर रवि लांडगे, जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
