कर्तव्यदक्ष पोलिसांच्या कामगिरीचा गौरव; प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे – बाळासाहेब बोराटे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले २८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
खेड: खेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्या कर्तव्यात तत्परता दाखविणाऱ्या प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने नेहमी उभे रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी केले आहे. खेड पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावल्याबद्दल पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने खेड पोलिसांचा विशेष सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
चांडोली (ता. खेड, राजगुरुनगर) येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ज्ञानेश्वर मारुती मरगज यांच्या रस्त्यावर लावलेल्या ट्रक मधून डिझेलची चोरी झाली होती. या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार मिळताच खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने चक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपीला अत्यंत अल्पावधीत जेरबंद केले. पोलिसांच्या या जलद आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे आणि कार्याध्यक्ष दीपक कलापुरे यांच्या मार्गदर्शनात खेड पोलिसांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या यशस्वी तपासात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, खेड पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार संतोष घोलप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबदे, पोलीस हवालदार अतुल डेरे, पोलीस अंमलदार निलेश सुपेकर आणि स्वप्नील गाढवे यांनी विशेष तत्परता दाखवून आरोपीला गजाआड केले. या सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि बस वाहतूकदारांच्या अडीअडचणीत नेहमीच मदत करणाऱ्या अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा पुढील काळात देखील असोसिएशनच्या वतीने गौरव केला जाईल, असा विश्वास उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी यावेळी व्यक्त केला. या सत्कार समार प्रसंगी पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे सचिव अरुण काळे, कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब घोमाल, इरफान पठाण, देवदत्त रावल, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ज्ञानेश्वर मारुती मरगज यांच्यासह इतर सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
