news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘राजर्षी शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व’ उत्साहात; उद्योजक सखाराम रेडेकर यांना ‘शाहू महाराज पुरस्कार’ प्रदान!

पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘राजर्षी शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व’ उत्साहात; उद्योजक सखाराम रेडेकर यांना ‘शाहू महाराज पुरस्कार’ प्रदान!

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते उद्घाटन; के.एस.बी. चौकात अभिवादन, १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पांडुरंग पाटील व संजय वडार यांना 'कोल्हापूर भूषण' तर विविध मान्यवरांना 'सामाजिक कार्यकर्ते' पुरस्काराने गौरव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड मनपाचे ‘राजर्षी शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व’ उत्साहात; उद्योजक सखाराम रेडेकर यांना ‘शाहू महाराज पुरस्कार’ प्रदान!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. संभाजीनगर, चिंचवड येथील साई मंदिर उद्यानात २५ व २६ जून रोजी आयोजित या प्रबोधन पर्वामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या समतावादी, पुरोगामी आणि लोककल्याणकारी विचारांचा जागर विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रबोधन पर्वाचे भव्य उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या सोहळ्यानंतर मे. जयेंदू मातोश्री Production यांनी ७० कलाकारांसह सादर केलेल्या ‘फोक संस्कृती’ या बहुरंगी लोककला कार्यक्रमाने उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

प्रबोधनपर्वाच्या दुसऱ्या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस तसेच चिंचवड येथील के.एस.बी. चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याच दिवशी शहरातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

महानगरपालिकेच्या मुख्य सोहळ्यात नगरसदस्य कुशाग्र कदम व उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रसिद्ध उद्योजक सखाराम रेडेकर यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील आणि संजय वडार यांना ‘कोल्हापूर भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यासोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनील गाडे, तानाजी भोसले, विठ्ठल मर्दाने, संजय व्हराबळे, दत्ता फासके, वर्षा विजय नाळे, अश्विनी लहू पाटील, योगिता विनायक रणसुभे, माधवी मिलिंद वेल्हाळ आणि धनश्री अक्षय पाटील यांना ‘सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच युवराज मुळे, करण अनिल कारंडे आणि रेखाताई प्रकाश मुगडे यांना ‘विशेष पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरणानंतर ‘गौरवशाली महाराष्ट्र’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि वारशाचे सुंदर दर्शन घडविण्यात आले. तसेच सायंकाळी साई मंदिर उद्यानात ‘स्वर स्वामी’ प्रस्तुत “वंदन- छत्रपती शाहू महाराजांना” या सांस्कृतिक कार्यक्रमाने शाहू महाराजांच्या कार्याला शाहिरी व गीतातून अभिवादन करण्यात आले.

या सोहळ्याप्रसंगी माजी महापौर मंगला कदम, नगरसदस्य कुशाग्र कदम, नगरसदस्या अनुराधा गोरखे, नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. तसेच कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष जगदीश परिट, सचिव सुनील पाटील, खजिनदार मिलिंद वेल्हाळ, उत्सव प्रमुख पी. वाय. पाटील आदी पदाधिकारी, कर्मचारी आणि शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!