news
पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील पीडितांना ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंचा’चा भक्कम आधार; विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी फुंकरले दुःख!नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश; गजानन नगर व ABC कॉलनीतील वीज समस्या सुटली!चऱ्होली बुद्रुक येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांचा उदंड प्रतिसाद; २५० हून अधिक बालकांना सुरक्षा कवच!अमरावतीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अंनिस’ शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे!शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर कडून अमरावती विभागात शाळांचा आढावा; शिल्लक निधीतून अभ्यासिका व संगणक सुविधा उभारण्याचे निर्देश!
Home अमरावती अमरावतीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अंनिस’ शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे!

अमरावतीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अंनिस’ शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे!

व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन व महिला सक्षमीकरणासाठी महासंकल्प; सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल एकल महिलांचा विशेष सन्मान © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण व अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर; महा. अंनिस अमरावती शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे यांची निवड

 

 

अमरावती, प्रतिनिधी जयकुमार चर्जन, २८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: सामाजिक परिवर्तनाचा संदेश देत व्यसनमुक्त, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारा आणि महिला सन्मान जपणारा समाज घडविण्याच्या उद्देशाने अमरावती येथे एका विशेष प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अमरावती) च्या व्यसनप्रबोधन व संघर्ष विभाग, महिला विभाग, विविध उपक्रम विभाग तसेच स्वराज्य वस्तीस्तर संघ (जेवड नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन तसेच विधवा/एकल महिला दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम, एकल महिला सत्कार, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक मार्गदर्शन आणि नशामुक्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जेवड नगर येथील महादेव मंदिर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष मा. कल्पनाताई राजूरकर या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय महिला फेडरेशनच्या मा. जया संजय मंडवधरे, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीच्या रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी मा. मिलिंद तायडे, मातृशक्ती संस्थेच्या मा. मनीषा टाकसाळ, माजी नगरसेविका मा. वंदना हरणे, मा. रजनी सवाई, मा. भूमिका पहूरकर, मा. उमा इंगोले तसेच मा. सुरेखा रंगारी यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, वाढती गुन्हेगारी, रस्ते अपघात, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि एकल महिलांसमोरील सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक प्रश्नांवर सखोल प्रकाश टाकला.

मार्गदर्शन करताना मा. जया संजय मंडवधरे म्हणाल्या की, “व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. घराघरातून व्यसनमुक्तीची चळवळ उभी राहिली तरच समाज निरोगी बनेल. त्याचबरोबर अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महिलांनी संघटित होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आवश्यक आहे.” याप्रसंगी माजी नगरसेविका मा. वंदना हरणे यांनीही विशेष उपस्थिती दर्शवून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच एकल महिला म्हणून प्रेरणादायी कार्याबद्दल मा. शिलाताई मोकळकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उभारण्यात आलेले नशामुक्ती जनजागृती प्रदर्शन सर्वांचे आकर्षण ठरले. यामध्ये विविध माहितीपर फलकांद्वारे व्यसनाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, कुटुंबावर होणारे विपरित परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याविषयी प्रभावी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महा. अंनिस अमरावतीचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले. मनाली इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर मंजू वासनिक यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांकडून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. विजया घोडेस्वार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला आणि मोनाली सदावर्ते यांनी आभार मानले.

कार्यक्रमानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अमरावती) जिल्हा व शहर शाखेची पाक्षिक बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी जनजागृती उपक्रम, व्यसनमुक्ती अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, महिला सक्षमीकरण तसेच गावागावात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले. याच बैठकीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती शहर शाखेच्या अध्यक्षपदी मा. मिलिंद तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष देशमुख, सचिन खोब्रागडे, डॉ. संदीप महल्ले, विजया करोले, दिगंबर मेश्राम, लक्ष्मण तडस, राधा तिडके, भाग्यश्री शामतकर, प्रमिला प्रधान, कविता दवाळे, हर्षा दाभाडे, सुनीता कोसरे, अर्चना गायकवाड, उज्वला गडलिंग, रेखा दामले, रुपाली चोपकर, मेघा गावंडे, वैशाली हरणे, अनिता हरणे, नलिनी गजभिये, मीना वाकोडे, सुजाता गुलसुंदरे, कांचन मासोदकर, अनिता राऊत, शीतल मेश्राम, माधुरी धवणे, अर्चना राऊत, राणी गायकवाड तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वराज्य वस्तीस्तर संघाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!