गजानन नगरमधील नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्येपासून अखेर दिलासा; आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन केबल व फिडर पिलर कार्यान्वित
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील गजानन नगर येथील ABC कॉलनीमधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या वीज समस्येचे अखेर कायमस्वरूपी निवारण करण्यात आले आहे. या भागात मागील दोन ते अडीच महिन्यांपासून मुख्य विद्युत केबल जळाल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. उन्हाळा आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वारंवार वीज जात असल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता.

नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने व सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश आले असून महावितरणच्या वतीने गजानन नगर परिसरात नवीन विद्युत केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. तसेच भविष्यात विजेचा दाब नियंत्रित राहण्यासाठी नवीन एल.पी. फिडर पिलर (L.P. Feeder Pillar) बसवून वीज पुरवठ्याचा लोड डिव्हाईड (विभाजित) करण्यात आला आहे. या अत्याधुनिक सुविधेशुळे आता भविष्यात वीज खंडित होण्याचा धोका टळला असून नागरिकांची मोठ्या त्रासातून सुटका झाली आहे.

हे काम प्रत्यक्ष जागेवर करून घेताना महावितरणचे अभियंता श्री. कदम साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांनी हे काम गतीने पूर्ण केले. “गजानन नगर परिसरातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. वीज, पाणी आणि रस्ते या नागरिकांच्या हक्काच्या गोष्टी असून जनतेच्या प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नासाठी आणि अडीअडचणीत मी जनसेवक म्हणून सदैव तत्पर राहणार आहे.” –श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन, नगरसेवक तथा सदस्य, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
हे जनहितार्थ काम तातडीने पूर्ण झाल्याबद्दल गजानन नगर आणि ABC कॉलनीतील सर्व नागरिकांनी आमदार शंकरभाऊ जगताप, नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन आणि महावितरणचे अभियंता श्री. कदम साहेब यांचे मनापासून आभार मानले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
