आयआयटी मद्रासकडून अमरावती जिल्ह्यात ‘डीडीएचआय’ अंतर्गत रस्ता सुरक्षा प्रशिक्षण संपन्न; अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
अमरावती प्रतिनिधी अविनाश वानखेडे, २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी आयआयटी मद्रासच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी’ (CoERS) तर्फे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने एका विशेष रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘डीडीएचआय’ (DDHI) उपक्रमांतर्गत हे एकदिवसीय महत्त्वपूर्ण प्रशिक्षण आज अमरावती येथील नियोजन भवन येथे संपन्न झाले.
अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने या विशेष प्रशिक्षणाचे नेटके नियोजन केले होते. या तांत्रिक व मार्गदर्शक सत्रासाठी आयआयटी मद्रासचे प्रमुख प्रकल्प अधिकारी डॉ. रोशन जोस आणि प्रकल्प अभियंता प्रदीप कुमार एनव्हीके यांनी उपस्थित राहून संबंधित विभागांना सखोल प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी यांच्यासह पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO), रस्ते विकास यंत्रणा आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या एकदिवसीय प्रशिक्षण सत्रामध्ये वर्गखोली प्रशिक्षणाद्वारे (Classroom Training) ‘डीडीएचआय’ आणि ‘एफपीएस’ (FPS) ॲप्लिकेशन्सचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी माहिती देण्यात आली. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रस्त्यावरील संभाव्य धोके व ब्लॅक स्पॉट कसे ओळखायचे, त्याची अहवाल यंत्रणा कशी कार्य करते आणि रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध शासकीय विभागांच्या नेमक्या काय जबाबदाऱ्या आहेत, यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
रस्ते अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ लक्षात घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने आणि वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ट्रॉमा केअर (Trauma Care) व्यवस्था कशी सक्षम करावी, तसेच आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद कसा असावा, यावरही या सत्रात विशेष चर्चा करण्यात आली. अमरावतीमधील रस्त्यांचे जाळे अधिक सुरक्षित आणि अपघातमुक्त करण्यासाठी आयआयटी मद्रासकडून मिळालेले हे तांत्रिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
