news
Home पिंपरी चिंचवड पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पहिल्या ऐतिहासिक ‘समरसता लोककला संमेलना’ची दिमाखात सांगता!

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पहिल्या ऐतिहासिक ‘समरसता लोककला संमेलना’ची दिमाखात सांगता!

स्वतंत्र लोककला विद्यापीठ स्थापन करण्याची कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांची मागणी; रघुवीर खेडकर, सुरेखा पुणेकर, मंगला बनसोडे यांच्या उपस्थितीने रंगला सोहळा, मधू कांबीकर यांना जीवनगौरव जाहीर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुण्यात पहिले ‘समरसता लोककला संमेलन’ उत्साहात संपन्न; महाराष्ट्राच्या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याच्या जतनासाठी स्वतंत्र लोककला विद्यापीठाची गरज – कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : “जनसामान्यांच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार असलेल्या लोककला आज कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्राचा हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जतन, संवर्धन आणि संशोधनासाठी स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना होणे ही आजच्या काळाची गरज आहे. शासनाने लोककलावंतांना आणि लोककलेच्या उपासकांना एकाच व्यासपीठावर आणण्याची संधी उपलब्ध करून दिली, ही अत्यंत ऐतिहासिक बाब असून हा लोककलावंतांचा पहिलाच भव्य महोत्सव ठरला आहे,” असे प्रतिपादन रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘समरसता लोककला संमेलना’च्या समारोप सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासनाने दरवर्षी अशा प्रकारच्या लोककला संमेलनांचे आयोजन करावे, तसेच भारतातील विविध राज्यांतील लोककलांना एकत्र आणण्यासाठी भविष्यात ‘भारतीय लोककला महोत्सव’ आयोजित करावा, अशी संकल्पना मांडत या कार्यात मराठी भाषा विद्यापीठ सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष धीरज घाटे हे होते. यावेळी संमेलनाध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी राज्य शासनाने हे संमेलन घेतल्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त केला, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याबद्दल त्यांनी जाहीर खंतही व्यक्त केली.

या संमेलनामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना त्यांच्या लोककला क्षेत्रातील प्रदीर्घ आणि मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीत हा सन्मान त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी स्वीकारला. संमेलनात झालेली मान्यवर लोककलावंतांची मनमोकळी मुलाखत हे मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये नंदेश उमप, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर आणि जयमाला इनामदार यांच्या प्रदीर्घ मुलाखतींमधून लोककलेचा संघर्षमय प्रवास, समृद्ध परंपरा आणि भावी वाटचाल याचे प्रभावी दर्शन रसिक प्रेक्षकांना घडले.

 समरसता लोककला संमेलनात लोककला, लोकसाहित्य आणि लोकपरंपरांच्या जतन, संवर्धन व विकासाच्या दृष्टीने सात महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते व एकमताने मंजूर करण्यात आले. या ठरावांचे वाचन काशीनाथ पवार यांनी केले. यामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत: १) जिल्हास्तरावर लोककला प्रशिक्षण व संशोधन केंद्रे स्थापन करणे. २) उपेक्षित लोककलांना सांस्कृतिक मुख्य प्रवाहात मानाचे स्थान देणे. ३) शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात लोकसंस्कृतीचा समावेश करणे. ४) लोककलावंतांना हक्काची सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करणे. ५) लोप पावत चाललेल्या पारंपरिक लोककलांचे ‘डिजिटल दस्तऐवजीकरण’ करणे. ६) नवोदित लोककलावंत व संशोधकांना विशेष प्रोत्साहन देणे. ७) स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना करणे.

 संमेलनादरम्यान आयोजित भव्य लोककला दिंडीत एक हजारांहून अधिक लोककलावंत पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच, दुर्मिळ होत चाललेल्या पारंपरिक लोकवाद्यांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन हे संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले. संमेलनातील कविसंमेलनानेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले; ज्यामध्ये प्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे, ज्येष्ठ कवी वा. ना. आंधळे आणि युवा कवी कुमार चव्हाण यांच्या ओजस्वी व जीवनस्पर्शी कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.

पारंपरिक वेशभूषेतील गोंधळी, वाघ्या-मुरळी, वासुदेव, भारूड, शाहिरी, लावणी, आदिवासी नृत्य आणि झाडीपट्टी आदी लोककलांच्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे वैभव बालगंधर्व रंगमंदिरात जिवंत झाले. यावेळी मा. डॉ. प्रवीण भोळे यांनी लोककलेचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारे अभ्यासपूर्ण चिंतन मांडले.

व्यासपीठावर समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, नंदेश उमप, मंगला बनसोडे, लीला गांधी, जयमाला इनामदार, सुरेखा पुणेकर, छायामाया खुटेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय खुडे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे, डॉ. धनंजय भिसे आणि जितेंद्र वाईकर यांनी अत्यंत प्रभावी व नेटकेपणाने पार पाडले. विविध लोककलांचे सादरीकरण करून या भव्य, वैचारिक आणि लोकसंस्कृतीच्या वैभवाने उजळून निघालेल्या ऐतिहासिक संमेलनाची सांगता करण्यात आली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!