news
Home अमरावती अमरावतीत महाराष्ट्र अंनिसच्या ‘आम्ही समतावादी’ अभियानाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद!

अमरावतीत महाराष्ट्र अंनिसच्या ‘आम्ही समतावादी’ अभियानाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद!

विजया करोले यांच्या नेतृत्वाखाली वटसावित्री पूर्णिमेला संवाद व वृक्षारोपणाचे विधायक उपक्रम; बडनेरा, दर्यापूर व अमरावती शहरात परंपरेला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘आम्ही समतावादी’ अभियानाला अमरावती जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; वटसावित्रीनिमित्त महिलांशी समतेचा संवाद, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

 

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, महाराष्ट्र राज्य महिला सहभाग विभागांतर्गत अमरावती जिल्हा महिला सहभाग विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या “आम्ही समतावादी” अभियानाला अमरावती जिल्ह्यात प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. वटसावित्री पूर्णिमेच्या निमित्ताने अमरावती शहर, बडनेरा, दर्यापूर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत महिलांशी प्रत्यक्ष संवाद, पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपणाचे विधायक उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडले. महिलांच्या वैयक्तिक श्रद्धेचा आदर राखत समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता, आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश या अभियानातून समाजाला देण्यात आला आहे.

या संपूर्ण जिल्हास्तरीय अभियानाचे नेटके मार्गदर्शन अमरावती जिल्हा महिला सहभाग विभागाच्या जिल्हा कार्यवाह विजया करोले यांनी केले. तसेच या उपक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सहभाग विभागाच्या सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य व सक्रिय सहभाग लाभल्याची माहिती विविध उपक्रम प्रमुख आशिष देशमुख यांनी दिली.

अभियानादरम्यान विविध केंद्रांवर महिलांशी संवाद साधताना वटसावित्री व्रतामागील मूळ भावनेचा आदर व्यक्त करण्यात आला. त्याच जोडीने वडाच्या वृक्षाचे पर्यावरणीय, सामाजिक व ऑक्सिजन निर्मितीमधील महत्त्व पटवून देण्यात आले. केवळ वडाची प्रतीकात्मक पूजा न करता वडासह इतर बहुगुणी वृक्षांचे संवर्धन करणे व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे ही आजच्या जागतिक तापमान वाढीच्या काळात काळाची गरज असल्याचा संदेश देण्यात आला. यासाठी अनेक ठिकाणी महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची प्रत्यक्ष कृतीही करण्यात आली.

यावेळी पती-पत्नीमधील परस्पर आदर व सन्मान, घरकामातील पुरुषांचा समान सहभाग, कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना असणारा समान अधिकार, भारतीय संविधानाने दिलेली समानतेची मूल्ये तसेच जुन्या रूढ परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक विचार यांची सांगड या विषयांवर महिलांशी मुक्त व मनमोकळा संवाद साधण्यात आला. तसेच उपवास करणाऱ्या महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे, याचेही मोलाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील विविध शाखांचा सक्रिय पुढाकार-   बडनेरा शाखेच्या वतीने मोनाली सदावर्ते यांच्या उत्तम समन्वयातून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पूजा दिहाडे, दिव्या पाडवार, संगीता पाडवार, शुभांगी पाडवार, शुभांगी झंझाड, वंदना झंझाड, पूजा झंझाड, रीना झंझाड, वंदना लेंडे, शीतल वैद्य, पंचफुला पाडवार, वर्षा खराबे, वनमाला झंझाड, चंद्रकला पाडवार आणि निर्मला किंडरळे आदी महिलांनी अतिशय सक्रिय सहभाग घेतला.  अमरावती शाखेच्या वतीने कांचन रुपुने यांनी उपस्थित महिलांशी समता, आरोग्य आणि पर्यावरण या त्रिसूत्रीवर अत्यंत प्रभावी व सोप्या भाषेत संवाद साधला. दर्यापूर शाखेच्या वतीने स्वाती चोंडके यांनी महिलांशी संवाद साधत समता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामीण भागातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.  अमरावती शहरातील अंबादेवी, बुधवारा आणि हनुमान नगर परिसरात जिल्हा महिला सहभाग विभागाच्या कार्यवाहक विजया करोले यांच्या थेट नेतृत्वाखाली महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून समता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक मूल्यांविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली.

श्रद्धेला कुठेही धक्का न लावता अत्यंत सुसंस्कृतपणे समतेचा विचार मांडण्याच्या या आगळ्यावेगळ्या अभियानाचे जिल्ह्यातील महिलांनी मनापासून स्वागत केले आहे. परंपरेसोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही आजच्या स्त्रीची गरज असल्याचे मत सहभागी महिलांनी व्यक्त केले. या अभियानाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात महिलांमध्ये सातत्याने वैचारिक जनजागृती सुरू असून, हा जिल्हास्तरीय उपक्रम पुरोगामी चळवळीला बळ देणारा ठरला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!