news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये व्हॉट्सॲप हॅकिंगद्वारे आर्थिक लुटीचे नवे फंदे; सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा!

पिंपरी चिंचवडमध्ये व्हॉट्सॲप हॅकिंगद्वारे आर्थिक लुटीचे नवे फंदे; सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा!

वरिष्ठांच्या नावाने येणाऱ्या संशयास्पद फाईल्स उघडणे टाळा; फसवणूक झाल्यास त्वरित १९३० क्रमांकावर संपर्क साधण्याचे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संशयास्पद Zip File आणि .APK फाईल्सद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांचे जाहीर आवाहन; व्हॉट्सॲप हॅकिंग आणि मालवेअरपासून सावधान राहण्याचा इशारा

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , १ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, शासकीय तसेच विविध खाजगी कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाचे जाहीर आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्या सायबर गुन्हेगारांकडून संशयास्पद ‘Zip File’ आणि ‘.APK’ फाईल्सचा वापर करून नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात असल्याने पोलिसांनी या नवीन सायबर क्राईमच्या पद्धतीबाबत (Modus Operandi) सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार सर्वप्रथम कोणत्याही खाजगी कंपनीमधील वरिष्ठ अधिकारी किंवा समाजातील नामवंत व्यावसायिक व्यक्तींचे व्हॉट्सॲप (WhatsApp) खाते हॅक करतात. त्यानंतर, त्या हॅक झालेल्या खात्यावरून त्यांच्या संपर्कातील (Contact List) कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला ‘Zip File’ किंवा ‘.APK’ फॉरमॅटमधील फाईल्स पाठवल्या जातात.

सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि त्यांनी ती फाईल उघडावी यासाठी सायबर लुटारू या फाईल्सना ‘बँक स्टेटमेंट’ (Bank Statement) किंवा ‘अकाऊंट स्टेटमेंट’ (Account Statement) अशी नावे देतात. संबधित व्यक्तीने आपल्या परिचयाच्या किंवा वरिष्ठांच्या नंबरवरून आलेला मेसेज समजून ती फाईल संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवर ओपन करताच, त्या उपकरणात घातक ‘मालवेअर’ (Malware) किंवा ‘व्हायरस’चा प्रवेश होतो. यामुळे संबंधित इलेक्ट्रॉनिक साधन संक्रमित होते. याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार मोबाईल व संगणकातील गुप्त डेटा चोरी करतात, तसेच बँकेची संवेदनशील माहिती प्राप्त करून परस्पर खात्यातील रक्कमेवर दरोडा टाकून आर्थिक फसवणूक करतात.

फसवणूक टाळण्यासाठी सायबर पोलिसांनी दिलेला ‘सुरक्षा मंत्र’:

  • अनोळखी व्हॉट्सॲप नंबरवरून किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नंबरवरून जरी अचानक कोणतीही संशयास्पद ‘Zip File’ अथवा ‘.APK’ फाईल प्राप्त झाल्यास, ती ओपन करण्यापूर्वी पाठवणाऱ्या व्यक्तीला थेट फोन करून खात्री करून घ्यावी.

  • संबंधित व्हॉट्सॲप मेसेजमध्ये पैशांचे किंवा तातडीच्या आर्थिक व्यवहारांचे सांगितले असल्यास, कोणतीही रक्कम पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला अधिकृत मोबाईल नंबरवर संपर्क साधून खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नये.

  • सोशल मीडियाद्वारे प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद ‘Zip File’ आणि ‘.APK’ फाईल्स मोबाईलमध्ये चुकूनही डाऊनलोड किंवा ओपन करू नयेत.

  • तुमचे व्हॉट्सॲप खाते इतर कोणत्याही अनोळखी डिव्हाइसला (Linked Devices) लिंक आहे का, याची वेळोवेळी तपासणी करावी आणि असल्यास ते त्वरित रिमूव्ह (Log out) करावे.

  • सुरक्षिततेसाठी आपल्या व्हॉट्सॲपचे ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ (Two-Step Verification) नेहमी ॲक्टिव्हेट ठेवावे.

  • आपली संगणकीय साधनसामग्री किंवा मोबाईल फोन व्हायरसने संक्रमित झाला आहे का, याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (CERT-In) आणि मायक्रोवर्ल्डने (MicroWorld) तयार केलेल्या ‘बॉट रिमूव्हल टूल’ (Bot Removal Tool) द्वारे उपकरणांची तपासणी करून घ्यावी.

  • मोबाईल फोन आणि संगणकामध्ये नेहमी अद्ययावत (Updated) अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करावा.

नागरिकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना अत्यंत सतर्क राहावे. जर दुर्दैवाने आपली सायबर फसवणूक झाली असल्यास, त्वरित केंद्र सरकारच्या अधिकृत www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा १९३० या हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी केले आहे.

– रोहिदास पवार (पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!