news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड अँटी एक्सटॉर्शन सेलची मोठी कारवाई; ३ लाखांची खंडणी घेणारा सराईत ‘मशन्या शिरोळे’ रंगेहात अटक!

पिंपरी-चिंचवड अँटी एक्सटॉर्शन सेलची मोठी कारवाई; ३ लाखांची खंडणी घेणारा सराईत ‘मशन्या शिरोळे’ रंगेहात अटक!

चाकणमधील सिक्युरिटी व्यावसायिक श्रीकांत बाबर यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी; सीपी विनय कुमार चौबे व डीसीपी रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ११ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

३ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी, ११.०६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: “सिक्युरिटीचा व्यवसाय बंद पाडू” अशी धमकी देऊन आणि जीवे मारण्याची भीती दाखवून ३ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांच्या पथकाने तब्बल ११,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत शामराव बाबर (वय ४४ वर्षे, रा. सर्वे नं. ७३, समर्थनगर, नवी सांगवी, पुणे) यांनी दिनांक ३० जून २०२६ रोजी पिंपरी येथील खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात येऊन रीतसर तक्रार दिली होती. आरोपी महेश सखाराम शिरोळे याने दिनांक २५ जून २०२६ ते २९ जून २०२६ या कालावधीत फिर्यादी श्रीकांत बाबर व त्यांच्या कंपनीचे सुपरवायझर संदीप कणसे यांना स्वतःच्या मोबाईलवरून सातत्याने फोन केले. “जर चाकण परिसरात सिक्युरिटीचा व्यवसाय चालवायचा असेल, तर पहिल्यांदा १० लाख, त्यानंतर ८ लाख, ७ लाख आणि शेवटी ६ लाख रुपये द्यावे लागतील,” अशी खंडणीची मागणी केली. चाकण परिसरात आपली मोठी दहशत असल्याचे सांगत त्याने ६ लाख रुपये न दिल्यास ‘खल्लास’ (जीवे मारण्याची) करण्याची धमकी दिली होती. सततच्या दबावानंतर अखेर आज ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चक्रावून सापळा रचला. भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या १२ खऱ्या नोटा (६,००० रुपये) आणि वर व खाली खऱ्या नोटा लावून मध्यभागी चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडियाच्या ५०० च्या ५८८ हुबेहूब दिसणाऱ्या डम्मी नोटा (२,९४,००० रुपये) असे एकूण ३ लाख रुपयांचे ६ बंडल रबर लावून प्लास्टिक पिशवीत तयार करण्यात आले. हे पैसे घेऊन सुपरवायझर संदीप कणसे याला पाठवण्यात आले.

दिनांक ३० जून २०२६ रोजी सायंकाळी १७.५० वाजता मॅक्झिन चौक, दिघी येथील एका स्वच्छतागृहाजवळ, आळंदी ते पुणे रोडवर आरोपी मशन्या ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (वय २८ वर्षे, रा. मेदनकर यांची खोली, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) हा ३,०००,००० रुपयांची खंडणी स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाने त्याला रंगेहात पकडले. दोन पंचांसमक्ष त्याच्याकडून एकूण ११,०६,००० रुपयांचा मुद्देमाल (ज्यामध्ये खंडणीची रक्कम, मोबाईल व इतर वस्तू) जप्त करण्यात आला असून घटनास्थळाचा प्रिट्रॅप पंचनामा करण्यात आला.

फिर्यादी श्रीकांत बाबर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मशन्या ऊर्फ महेश सखाराम शिरोळे याच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३११/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

या पथकाने केली कामगिरी: सदरची धडाकेबाज कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मा. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) मा. श्री. रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) मा. श्री. प्रवीण मोरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, सुनील कानगुडे, प्रदिप पोटे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, गणेश गिरीगोसावी, चंद्रकांत जाधव, किरण जाधव, संदिप गंगवणे आणि निलेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!