पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनाचा पहिल्या तिमाहीतच ‘माईलस्टोन’; ५२६ कोटींचा कर जमा, ४.४५ लाख मालमत्ताधारकांनी घेतला सवलतींचा लाभ
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच (एप्रिल ते जून) कर वसुलीचा ऐतिहासिक आणि उच्चांकी ‘माईलस्टोन’ गाठला आहे. अवघ्या तीन महिन्यांत पालिकेच्या तिजोरीत तब्बल ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. शहरातील एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५९.८४ टक्के नागरिकांनी पहिल्या तिमाहीतच प्रामाणिकपणे कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. या विक्रमी कर संकलनाबद्दल महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील सर्व जागरूक करदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मोकळ्या जमिनी मिळून सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी पहिल्या तिमाहीतच कराचा भरणा केला आहे. मालमत्ता कर वेळेत गोळा व्हावा आणि नागरिकांना सवलतींचा फायदा मिळावा, यासाठी कर संकलन विभागाने यंदा व्यापक स्तरावर जनजागृती मोहीम राबवली होती. याचा सकारात्मक परिणाम म्हणून ३ लाख ४७ हजार ५६४ मालमत्ता धारकांनी घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात कर भरण्यास प्राधान्य दिले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिकेने महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना थेट घरपोच बिलांचे वाटप केले. त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक कराचा भरणा केल्याची माहिती कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
ऑनलाईन माध्यमाला नागरिकांची पसंती: कर संकलनाचा तपशील
| कर भरणाचा प्रकार | जमा झालेली रक्कम |
| ऑनलाइन | ४०७ कोटी ८९ लाख रुपये |
| रोख (Cash) | २१ कोटी ४७ लाख रुपये |
| धनादेशाद्वारे (Cheque) | १६ काेटी २४ लाख रुपये |
| डिमांड ड्राफ्ट (DD) | १५ काेटी ७५ लाख रुपये |
| विविध ॲप्स (Mobile Apps) | १० काेटी ४५ लाख रुपये |
कर भरणाऱ्या मालमत्तांची वर्गवारी
-
निवासी मालमत्ता: ३ लाख ८२ हजार ५२२
-
बिगरनिवासी (व्यावसायिक): ३३ हजार ७९३
-
मिश्र स्वरूपाच्या मालमत्ता: ८ हजार ६२३
-
औद्योगिक (Industrial): ३ हजार ७५
-
मोकळ्या जमिनी: २ हजार ५९१
-
इतर: १३
शहरातील १८ कर संकलन झोनचा विचार करता, यंदाही वाकड विभागीय कार्यालयाने ७२ कोटी ८७ लाख रुपयांची वसुली करत शहरात अव्वल स्थान पटकावले आहे. इतर झोनमधील कर संकलन पुढीलप्रमाणे: थेरगाव (४६ कोटी ७१ लाख), किवळे (३८ कोटी ३७ लाख), चिखली (३७ कोटी ९५ लाख), कस्पटे वस्ती (३९ कोटी ३३ लाख), भोसरी (३४ कोटी ७३ लाख), चिंचवड (३४ कोटी ४७ लाख), पिंपरी वाघेरे (३२ कोटी ५३ लाख), मोशी (३१ कोटी २२ लाख), मनपा भवन (२८ कोटी ७५ लाख), सांगवी (२६ कोटी), आकुर्डी (२३ कोटी ९० लाख), फुगेवाडी (२० कोटी ९७ लाख), चऱ्होली (१७ कोटी ८२ लाख), निगडी प्राधिकरण (१३ कोटी २५ लाख), दिघी-बोपखेल (११ कोटी ८८ लाख), तळवडे (११ कोटी २३ लाख) आणि पिंपरीनगर (३ कोटी ९९ लाख).
पहिल्या तिमाहीतील कर वसुलीचा वाढता आलेख (पाच वर्षांची तुलना)
| आर्थिक वर्ष | पहिल्या तिमाहीत वसूल झालेला कर |
| २०२१-२२ | १७१ कोटी रुपये |
| २०२२-२३ | २५५ कोटी रुपये |
| २०२३-२४ | ४५४ कोटी रुपये |
| २०२४-२५ | ४४० कोटी रुपये |
| २०२५-२६ | ५२४ कोटी रुपये |
| २०२६-२७ (चालू वर्ष) | ५२६ कोटी रुपये |
“करसंकलन विभागाने करवसुलीसाठी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये कर भरण्याचा मोठा उत्साह दिसला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या तिमाहीत एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी कर भरला आहे. सर्व करदात्यांचे आभार.”
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका
“सोशल मीडिया, प्रत्यक्ष संपर्क आणि एसएमएसद्वारे करण्यात आलेल्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पहिल्या तिमाहीतच कर भरण्यास प्राधान्य देऊन नागरिकांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“मालमत्ताकराची बिले वेळेवर पोहोचल्याने नागरिकांनी यावर्षीही विक्रमी कर भरला आहे. नावीन्यपूर्ण कल्पना आणि संपूर्ण टीमच्या सांघिक कामगिरीमुळेच आम्ही ५२६ कोटींचा टप्पा गाठण्यात यशस्वी झालो आहोत.”
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“पहिल्या तिमाहीत सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाले आहे. आता यापुढील काळात आमचे पूर्ण लक्ष मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर असणार आहे. थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा आधीच दिल्या आहेत. मालमत्ता जप्त होण्याची नामुष्की टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तात्काळ कराचा भरणा करावा, अन्यथा जप्ती मोहीम तीव्र केली जाईल.”
– सचिन पवार, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
