news
Home पिंपरी चिंचवड पीसीएमसी स्थायी समितीचा मोठा निर्णय; औषध खरेदी व पायाभूत विकासकामांसह विविध कल्याणकारी योजनांना हिरवा कंदील!

पीसीएमसी स्थायी समितीचा मोठा निर्णय; औषध खरेदी व पायाभूत विकासकामांसह विविध कल्याणकारी योजनांना हिरवा कंदील!

शासनाकडून ५ कोटींचा निधी प्राप्त, रावेत एक्स्प्रेस फिडरसाठी स्वयंचलित यंत्रणा; दिव्यांगांना नाममात्र शुल्कात मिळणार 'एमएस-सीआयटी'चे धडे - सभापती अभिषेक बारणे यांची माहिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीची बैठक संपन्न; आरोग्य, शिक्षण आणि विविध विकासकामांच्या कोट्यवधींच्या विषयांना मंजुरी

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध विकासकामांसह आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाच्या अनेक विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.

यावेळी माहिती देताना सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या वतीने महानगरपालिकेस ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीचा वापर प्रामुख्याने पालिकेच्या मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसाठी, आरोग्य साहित्य खरेदी, महिलांसाठी विशेष आरोग्यविषयक सुविधा, तसेच पर्यावरण आणि पर्यटनाचा विकास करण्यासाठी केला जाणार आहे. शहरात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याणकारी योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.”

आज झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच स्थायी समितीचे सर्व सदस्य आणि महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या रुग्णालयांसाठी ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत आवश्यक असणारी औषधे, उपभोग्य वस्तू, ऑर्थोपेडिक साहित्य (अस्थिव्यंगोपचार) आणि इतर विविध प्रकारच्या जीवनरक्षक औषधांच्या खरेदीस मंजुरी देण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी अंतर्गत MS-CIT उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि भटक्या जमातीतील लाभार्थ्यांना केवळ १०% शुल्कात, तर ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना अवघ्या ५% शुल्कात संगणक प्रशिक्षणाची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे.  शहरातील झोपडपट्टी भागातील सेवाशुल्क बिले वाटप आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम आता महिला बचत गटांना देण्यात आले आहे. यामुळे स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रभाग क्रमांक २० मधील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आवश्यक असणारी जलनिःसारण (ड्रेनेज) कामे आणि सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्यात आली.  रावेत येथील एक्सप्रेस फिडरवर शहराचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी अत्याधुनिक ‘स्वयंचलित यंत्रणा’ बसवण्याच्या कामाला मंजुरी मिळाली. शहरातील जलशुद्धीकरण केंद्र व पंप हाऊस येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अत्याधुनिक अग्निशामक उपकरणे बसवण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे या निर्णयांद्वारे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या या बैठकीत घेतलेले निर्णय अत्यंत सर्वसमावेशक आहेत. विशेषतः आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रांवर दिलेला भर शहराच्या विकासाची सकारात्मक दिशा अधोरेखित करतो. औषध खरेदी आणि ५ कोटींच्या निधीतून शाळांचा बदलणारा चेहरा यामुळे सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे.

महिला बचत गटांना आर्थिक बळ देणे आणि दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणात मोठी सवलत देऊन सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन महापालिकेने जपला आहे. कोणतीही कामे प्रलंबित न ठेवता, जनहिताचे हे सर्व विषय तातडीने मार्गी लावून प्रशासनाने दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. या निर्णयांची अंमलबजावणी वेळेत झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या वैभवात आणि नागरिकांच्या जीवनमानात मोलाची भर पडेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

“शहरातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणारे हे निर्णय आहेत. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर आम्ही विशेष भर दिला आहे. कोणतीही प्रलंबित कामे न ठेवता लोकहिताची कामे वेळेत पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य आहे.”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!