news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड मनपातील कथित घोटाळे लपवण्यासाठी ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ बंद; माजी नगरसेवक मारुती भापकर कडाडले!

पिंपरी-चिंचवड मनपातील कथित घोटाळे लपवण्यासाठी ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ बंद; माजी नगरसेवक मारुती भापकर कडाडले!

नगरसेवकांच्या बोलण्यावर निर्बंध आणणाऱ्या भाजप कोर कमिटीवर तीव्र प्रहार; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील प्रशिक्षणावरून प्रशांत शितोळे यांना टोला, थेट प्रक्षेपण सुरू न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भाजपाचा ‘हुकूमशाही’ कारभार, नगरसेवकांची अवस्था ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी; थेट प्रक्षेपण बंद केल्यास पिंपरी चिंचवडकर रस्त्यावर उतरणार: मारुती भापकर यांचा घणाघात

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

“दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ताधारी भाजपचा लोकशाही विरोधी आणि हुकूमशाही कारभार सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांची अवस्था तर ‘मुकी बिचारी, कुणी कशीही हाका’ अशी झाली आहे,” असा घणाघाती आरोप प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला आहे. शहरांमधील विविध गैरव्यवहार दडपण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठीच भाजप नगरसेवकांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली असल्याचा टोलाही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लगावला आहे. मारुती भापकर यांनी भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील अंतर्गत राजकारणावर तीव्र आक्षेप घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भापकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, “केंद्र आणि राज्य सरकारला जनतेच्या विरोधातील धोरणे, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले की लगेच राष्ट्रद्रोही ठरवले जाते. ‘सौगंध राम की खाते है, हम मंदिर वही बनायेंगे’ असा घोष करून प्रभू रामचंद्रांचे भक्त फक्त आम्हीच आहोत, असा दावा भाजप करतो. मात्र, अयोध्येतील जमीन घोटाळे आणि प्रभू श्रीरामचंद्र दानपेटीचा बहुचर्चित ६०० कोटी रुपयांचा घोटाळा या विरोधात बोलणाऱ्यांना ‘श्रीराम द्रोही’ म्हटले जाते. ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि प्राप्तिकर विभागाचा (Income Tax) वापर करून, लोकप्रतिनिधींना पदे व आर्थिक प्रलोभने देऊन लोकनियुक्त सरकारे पाडण्याचे काम केले जात आहे.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सदस्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये हेच शिक्षण दिले जाते का, असा सवाल त्यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवड भाजपचे माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, अध्यक्ष शत्रुघ्न काटे  आणि मोरेश्वर शेंडगे यांच्या कोर कमिटीच्या बैठकीत महापालिका सभागृहातील चर्चा व माध्यमांमधील पडसादांवरून काही बंधने घालण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘पार्टी लाईन’च्या विरोधात जाऊन बोलणाऱ्या आपल्याच नगरसेवकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

यावर आक्षेप घेताना भापकर म्हणाले, “बहुसदस्य पद्धतीमध्ये ५५ ते ६० हजार मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक केवळ एका प्रभागाचे नसून संपूर्ण शहराचे असतात. त्यामुळे प्रभाग आणि शहरातील पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज, मोकळे भूखंड, निविदा प्रक्रियेतील रिंग, सल्लागारांचे चुकीचे सल्ले, गैरकारभार व भ्रष्टाचार याविरोधात सभागृहात बोलण्याचा अधिकार सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्वच नगरसेवकांना असायला हवा.”

भापकर यांनी महापालिकेतील अनेक कथित घोटाळे आणि उधळपट्टीवर बोट ठेवले आहे:

  • ६० कोटी रुपयांच्या वर्गीकरणाच्या गैरव्यवहाराच्या उपसूचना.

  • महापौर, आमदार आणि विरोधी पक्षनेत्यांशी संबंधित संस्थांना शैक्षणिक भूखंडांचे संशयास्पद वाटप.

  • सांगवी येथील पुलाच्या संदर्भात झालेला अवाजवी खर्च.

  • अवघ्या २ किलोमीटर रस्त्यासाठी ८२ कोटी रुपयांची काढलेली निविदा.

  • मनपाची आर्थिक परिस्थिती खराब असताना टेंडर प्रक्रियेतून होणारे नुकसान.

  • आयुक्त व महापौरांसाठी नवीन महागड्या गाड्या आणि दालनांवर होणारी कोट्यवधींची उधळपट्टी.

महापालिका सभागृहात करदात्या नागरिकांसाठी कामकाजाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) सुरू होते. याद्वारे काही सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी वरील विषयांवर चर्चा घडवून आणून कारभाराचे खरे दर्शन नागरिकांना घडवले. म्हणूनच, हा कारभार लपवण्यासाठी सत्ताधारी भाजपाने आयुक्त विजय सूर्यवंशी यांना आदेश देऊन हे थेट प्रक्षेपण बंद पाडले आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांनीही ‘नंदीबैलासारखी’ मान डोलावून त्यावर बंदी आणली, असा थेट आरोप भापकर यांनी केला.

कालच्या पत्रकार परिषदेत प्रशांत शितोळे यांनी नगरसेवकांना मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी नेणार असल्याचे घोषित केले. यावर टीका करताना भापकर म्हणाले, “याचा अर्थ असा की, हे नगरसेवक प्रशिक्षण नसताना गैरकारभाराविरुद्ध बोलतात. आता आपल्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भूखंडाचे श्रीखंड’ खाल्ल्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून हे सर्व कसे झाकायचे? पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ असे प्रशिक्षण देण्याचा विचार भाजप कोर कमिटीचा आहे का?”

“भय व भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची हमी देऊन सत्तेवर आलेल्या भाजपने लोकहितासाठी नगरसेवकांना सभागृहात बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. तसेच, महापालिका सभागृहाचे थेट प्रक्षेपण तातडीने पुन्हा सुरू करावे. जर हे थेट प्रक्षेपण सुरू झाले नाही, तर पिंपरी चिंचवडची जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि याची खूप मोठी किंमत सत्ताधाऱ्यांना चुकवावी लागेल,” असा इशारा शेवटी मारुती भापकर यांनी दिला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!