भक्ती-शक्ती उड्डाणपुलावर ‘१४५ कोटीं’नंतरही पुन्हा भगदाड! पिंपरी-चिंचवड मनपाच्या ढिम्मा कारभारावर ताशेरे; ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अन्यथा भाजपचे सचिन काळभोर यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: देशात ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘आदर्श प्रशासन’ म्हणून मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निकृष्ट आणि भ्रष्टाचारी कारभाराचे जाहीर वाभाडे निघाले आहेत. निगडी येथील वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या ‘भक्ती-शक्ती उड्डाणपुलाच्या’ गोलाकार भागात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा एक महाकाय व भीषण भगदाड पडले आहे. या भगदाडामुळे वाहनचालक आणि लाखो नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाच्या डोळेझाक आणि ढिम्मा कारभारावर तीव्र ताशेरे ओढत भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते व नेते श्री. सचिन काळभोर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. “महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश चौक (निगडी ग्रेड सेपरेटर) हा मार्ग वाहतुकीसाठी तात्काळ बंद करून उड्डाणपुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि दोषी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा,” अशी आक्रमक मागणी सचिन काळभोर यांनी लावून धरली आहे.
निगडी येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे बांधकाम सन २०१८ ते २०२० या कालावधीत सुमारे १४५ कोटी रुपये इतका अवाढव्य खर्च करून करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी संबंधित ठेकेदार कंपनीला आधी १८ महिन्यांची मुदत आणि त्यानंतर आणखी ६ महिन्यांची मेहेरबानी (मुदतवाढ) महापालिकेने दाखवली होती.
एवढा प्रचंड जनसामान्यांच्या करातून गोळा झालेला पैसा खर्च करूनही अवघ्या ६ वर्षांत उड्डाणपुलाला वारंवार भगदाडे पडत आहेत. यावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य (Engineering) विभागाचे नियंत्रण शून्य होते की अधिकाऱ्यांचे हात कंत्राटदारासोबत ओले झाले होते? असा संतप्त सवाल सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे. बांधकामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाबाबत आता थेट महापालिकेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही याच उड्डाणपुलावर अशाच प्रकारे भगदाड पडल्याची गंभीर घटना घडली होती. त्यावेळी देखील सचिन काळभोर आणि जागरूक नागरिकांनी संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालत कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केली नाही.
प्रशासनाच्या याच पाठीशी घालण्याच्या भूमिकेमुळे ठेकेदाराचे धाडस वाढले आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात पुन्हा उड्डाणपूलाचे पितळ उघडे पडले. हा उड्डाणपूल कधीही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, पालिका प्रशासन मात्र केवळ अपघाताची आणि निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे अधिकृत लेखी तक्रार सादर करून प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत. १. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि झालेल्या नुकसानीची पूर्ण वसुली कंत्राटदाराकडून करावी. २. उड्डाणपुलाचे तात्काळ त्रयस्थ संस्थेकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (Structural Audit) करण्यात यावे. ३. उड्डाणपूल सुरक्षित असल्याची तांत्रिक खात्री होईपर्यंत निगडी ग्रेड सेपरेटर मार्ग तात्पुरता बंद ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
“जनतेचा पैसा भ्रष्टाचार करून कंत्राटदारांच्या घशात घालणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रशासनाने जर २४ तासांत यावर कडक पावले उचलली नाहीत, तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही व शिवशाही मार्गाने महापालिकेच्या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडतील!”
– सचिन काळभोर, भाजप नेते, पिंपरी-चिंचवड
सचिन काळभोर यांनी थेट पुराव्यांसह प्रशासकीय नाकर्तेपणावर ओढलेल्या या ताशेऱ्यांमुळे महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांचे कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
