news
मोशी कचरा डेपो दुर्घटना: सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे थेट घटनास्थळी; NDRF आणि अग्निशमन दलाच्या बचावकार्याचा घेतला आढावाअयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निधी लुटीप्रकरणी पिंपरी-चिंचवड काँग्रेस आक्रमक; नवनियुक्त शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे ‘सत्याग्रह’ आंदोलनदिघी हद्दीत माऊलींच्या पालखीत चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची तत्पर कारवाईरोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर; डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते चिंचवडमध्ये होणार भव्य गौरवपिंपरी-चिंचवड मनपा शालेय साहित्य खरेदी घोटाळा; खासदार संजय राऊत यांचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
Home मुख्यपृष्ठ दिघी हद्दीत माऊलींच्या पालखीत चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची तत्पर कारवाई

दिघी हद्दीत माऊलींच्या पालखीत चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची तत्पर कारवाई

वारकऱ्याच्या वेशातील पोलिसांना मोठे यश; १.५० लाखांचे मिनी गंठण हस्तगत करत संभाजीनगरच्या नयना काळेसह साथीदाराला रंगेहात पकडले | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माऊलींच्या पालखी सोहळ्यात भाविकांचे दागिने लांबवणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखा युनिट-३ ने पकडले रंगेहात; १.५० लाखांचे सोन्याचे मिनी गंठण जप्त, पिंपरी-चिंचवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ला मोठे यश आले आहे. पालखी सोहळ्यात साध्या वेशात तैनात असलेल्या पोलीस पथकाने अत्यंत सतर्कता दाखवत दोन महिला चोरांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जप्त केले आहे. या कामगिरीमुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखालील पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यतत्परतेचे वारकरी व नागरिकांमधून कौतुक होत आहे.

आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन वारकऱ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला जाऊ नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या अधिपत्याखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती.

यातील एका पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिलीप राठोड, निखिल फापाळेस्वप्नील महाले यांचा समावेश होता. हे पथक माऊलींच्या पालखीच्या चारी बाजूंनी आळंदीपासून ते बोपखेल फाट्यापर्यंत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी साध्या पोशाखात पायी चालत तैनात होते.

हे पोलीस पथक वारकऱ्यांसोबत पायी चालत असताना, पालखी सोहळा दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला. यावेळी फिर्यादी महिला भाविक सौ. सुनीता नारायणराव राऊत (वय ५० वर्षे, रा. चहोली फाटा) या माऊलींच्या दर्शनासाठी पालखीजवळ आल्या. दर्शन घेण्याच्या गडबडीत त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेने सुनीता राऊत यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसका मारून तोडले आणि सोबतच्या दुसऱ्या महिलेकडे सुपूर्द केले.

हा प्रकार साध्या वेशात असलेल्या पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि स्वप्नील महाले यांनी अचूक हेरला. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना आवाज देऊन त्या दोन्ही महिलांना जागेवरच रंगेहात पकडले.

ताब्यात घेतलेल्या महिलांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने कसून चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे नयना विष्णू काळे (वय २० वर्ष, रा. धारेगाव मिटमिटा छावणी, संभाजीनगर) व एक विधीसंघर्षित (अल्पवयीन) महिला अशी सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडून हिसका मारून चोरी केलेले १३ ग्रॅम वजनाचे, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जप्त केले आहे.

याप्रकरणी फिर्यादी सुनीता राऊत यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ३१९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सुदर्शन साईदास राठोड यांच्या आदेश व सूचनेनुसार करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिलीप राठोड, निखिल फापाळेस्वप्नील महाले यांनी ही धाडसी कारवाई पूर्ण केली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!