news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड पुनावळे डेपो सुरू करून मोशीवरील ताण कमी करा; नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांची महासभेत आक्रमक मागणी

पुनावळे डेपो सुरू करून मोशीवरील ताण कमी करा; नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांची महासभेत आक्रमक मागणी

शहरात १० विविध ठिकाणी आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचा तोडगा; मोशीकरांच्या हक्कांसाठी लोकप्रतिनिधीचा थेट रणसंग्राम | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“मोशी गावाने संपूर्ण महापालिकेचा ठेका घेतलाय का?” – नगरसेवक निखिल बोऱ्हाडे महासभेत कडाडले! मोशीत कचरा टाकण्यास तीव्र विरोध करत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पांची केली आग्रही मागणी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , १५ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: “आमच्या मोशी गावाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कचरा वाहून नेण्याचा ठेका घेतला आहे का? आमच्या संपूर्ण गावाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आता या प्रशासनामुळे आली आहे,” अशा अत्यंत संतप्त आणि जळजळीत शब्दांत भाजपचे धडाडीचे नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. नुकत्याच मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, निखिल बोऱ्हाडे यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेत स्थानिक नागरिकांच्या वेदनांना वाचा फोडली.

आपल्या भागातील जनतेच्या हक्कासाठी आणि आरोग्यासाठी महासभेत थेट प्रशासनाला शिंगावर घेण्याच्या त्यांच्या या लढाऊ बाण्यामुळे, एक अत्यंत संवेदनशील, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता म्हणून निखिल बोऱ्हाडे यांची प्रतिष्ठा संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड उंचावली आहे.

महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी मोशीकरांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय प्रखरतेने मांडला.

ते म्हणाले, “कचरा डेपोमुळे मोशी परिसरातील भूजल पातळी पूर्णपणे दूषित झाली आहे. परिसरातील नागरिकांच्या घरात नळ आणि बोअरवेलमधून उग्र वासाचे व दूषित पाणी येत असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. मोशीकरांनी नक्की काय गुन्हा केला आहे? खडकी डेपोतील कचरा देखील पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत मोशीतच का आणला जातो? या पापात सहभागी असणाऱ्यांना आणि या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या प्रशासनाला नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला?” असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला.

प्रशासनाला इशारा देताना ते अत्यंत आक्रमकपणे म्हणाले, “आता यापुढे आम्ही मोशीत कचरा टाकू देणार नाही. मोशी कचरा डेपोकडे येणारी एकही कचऱ्याची गाडी गावात फिरू दिली जाणार नाही.”

केवळ विरोध न करता नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी या समस्येवर अत्यंत अभ्यासूपणे कायमस्वरूपी तोडगा सभागृहासमोर मांडला. त्यांनी महापालिकेकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या. पुनावळे येथील कचरा डेपोसाठी नियोजित असलेली जागा महापालिकेने तात्काळ ताब्यात घेऊन तिथे काम सुरू करावे, जेणेकरून मोशीवरील ताण कमी होईल. संपूर्ण शहराचा कचरा एकाच गावावर न टाकता, पिंपरी-चिंचवडमधील किमान १० वेगवेगळ्या प्रभागांत विकेंद्रित पद्धतीने स्वतंत्र कचरा डेपो आणि आधुनिक ‘वेस्ट टू एनर्जी’ (Waste-to-Energy) प्रकल्प उभारण्यात यावेत. आगामी विकास आराखड्यात (DP) या १० नवीन प्रकल्पांसाठी तातडीने जागांची निश्चिती करून आवश्यक निधीची तरतूद करावी.

निखिल बोऱ्हाडे यांनी सभागृहात मांडलेली भूमिका ही केवळ राजकीय नसून ती मोशीतील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या अस्तित्वाची आणि आरोग्याची लढाई आहे. कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासावर केवळ चर्चा न करता, त्यांनी प्रशासनाला कृती करण्यास भाग पाडणारा इशारा दिला आहे. आपल्या प्रभागातील जनतेला दूषित पाणी आणि दुर्गंधीपासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी बोऱ्हाडे यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे मोशी आणि पंचक्रोशीतील नागरिकांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांचे नेतृत्व अधिक कणखर आणि विश्वासास पात्र ठरले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!