“स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी मातंग समाजाला आता सिंहावलोकन करण्याची गरज!” – माजी आमदार सुधाकर भालेराव; पिंपरी-चिंचवडमधील ‘सामाजिक न्याय समर्थन परिषदेत’ आरक्षणाच्या तिसऱ्या आणि निर्णायक लढ्याची हाक
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १५ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “स्वतःचे घटनात्मक अधिकार आणि न्याय्य हक्क मिळवण्यासाठी मातंग समाजाने गेल्या अनेक दशकांपासून अविरत संघर्ष केला आहे. पहिला लढा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी दिला गेला, तर दुसरा लढा क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग मिळवण्यासाठी यशस्वी झाला. आता तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णायक लढा हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा (आरक्षण मिळवण्याचा) आहे. ही केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक न्यायाची लढाई आहे. या लढ्यात यश मिळवण्यासाठी संपूर्ण मातंग समाजाला आता भूतकाळाचे सिंहावलोकन करून अत्यंत ताकदीने एकत्र येण्याची गरज आहे,” असे परखड प्रतिपादन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले.
मातंग सेवा संघ, भारतीय लहुजी पॅंथर आणि क्रांतिवीर विचारमंच या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे रविवारी (१२ जुलै) आरक्षण उपवर्गीकरणाच्या ऐतिहासिक पाठिंब्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर मातंग समाजाची “सामाजिक न्याय समर्थन परिषद” मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत बोलताना त्यांनी समाजाला पुढील संघर्षाची दिशा दाखवली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मातंग सेवा संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजातील कमतरतांवर बोट ठेवत विरोधकांच्या हेतूंवर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले, “इतर समाजातील काही लोक मातंग समाजाला धार्मिकतेच्या नावाखाली जाणीवपूर्वक अंधश्रद्धेकडे ढकलून प्रगतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या समाजातील जे लोक शिकून पुढे गेले आहेत, त्यांनी मागे राहिलेल्या बांधवांना मदतीचा हात दिला पाहिजे. आपण त्यांच्या बरोबरीने येऊ नये म्हणूनच काही घटकांकडून उपवर्गीकरणाला विरोध करण्याचे मोठे राजकीय षडयंत्र आखले जात आहे.”
यावेळी आडागळे यांनी मातंग समाजातील तरुणांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी ‘लहुजी सैनिक दल’ स्थापन करत असल्याची मोठी घोषणा केली आणि तरुणांना यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “आम्ही कोणाच्याही हक्काचे आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचे उपवर्गीकरणातून स्वतंत्र आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जेष्ठ मार्गदर्शक व भारतीय लहुजी पॅंथरचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी समाजावर आजवर झालेल्या अन्यायाचा पाढाच सभागृहात वाचला. ते म्हणाले, “आमच्या हक्काच्या सामाजिक न्याय विभागाचे बजेट नेमके कुणाच्या पदरात पडले? ज्या समाजाचा मंत्री असतो, केवळ त्यांनाच सरकारी योजनांचे लाभ मिळतात, आम्हाला मात्र काहीच मिळत नाही. आमच्या हक्काच्या शाळा नाहीत, चांगल्या नोकऱ्या नाहीत; फक्त चतुर्थ श्रेणीची कामे आमच्या वाट्याला येतात आणि तीही अत्यंत कमी प्रमाणात दिली जातात. समाज कल्याण विभागाने अनेक शिफारसी केल्या, आदेश काढले, पण शासन स्तरावर त्याचा जीआर (GR) निघाला नाही. आरक्षणाच्या या लढ्यामध्ये उद्योग, भूखंड, शाळा, महिलांचे सबलीकरण आणि वसतिगृहे अशा एकूण ६८ महत्त्वाच्या शिफारसी आहेत. या सर्व शिफारसी तातडीने लागू झाल्या पाहिजेत.”
लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी राजकीय व्यवस्थेवर कडक शब्दांत तोफ डागली. ते म्हणाले, “मातंग समाजाचे अमूल्य मतदान नेहमी दुसऱ्यांच्या पारड्यात पडते, म्हणूनच आज आमचा हक्काचा कार्यकर्ता विधानसभेत किंवा सत्तेच्या चावीवर निवडून येत नाही. आता आपण शांत बसायचे नाही. राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या समाजाला पूर्णपणे जागृत व्हावे लागेल. वेगवेगळ्या सरकारांनी केवळ आश्वासने दिली आणि आमचे अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पाडले. गेल्या ६ वर्षांपासून आम्हाला बजेट मिळालेले नाही. त्यामुळे आता सर्व मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हा लढा थांबणार नाही.”
या महत्त्वपूर्ण परिषदेचे नेटके संयोजन करण्यासाठी बापू पाटोळे, सविता आव्हाड, धीरज सकट, सचिन धूनगव, डी. पी. खंडाळे, रामदास कांबळे, सुरेश जोगदंड, नाना कांबळे, महादेव आडागळे, विजय कांबळे, कालिंदा एडके, शांताराम खुडे, लक्ष्मण आडागळे आदी कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अविनाश शिंदे यांनी केले, उत्कृष्ट सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार बापू वाघमारे यांनी मानले. या परिषदेमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील मातंग समाजामध्ये आपल्या हक्कांच्या लढ्यासाठी एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


