news
पिंपरी-चिंचवड मनपाची शालेय विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना; ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपासमोशी कचरा डेपो दुर्घटनेचे पडसाद; महासभेचे मुख्य प्रवेशद्वार रोखून विरोधकांचे महापालिकेत भव्य ठिय्या आंदोलनसोनम वांगचूक यांच्या ऐतिहासिक उपोषणाला पिंपरी-चिंचवडमधून बळ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीआरक्षणाचे उपवर्गीकरण करून स्वतंत्र न्याय मिळवून द्या; मातंग समाजाचे शासन आणि राजकीय व्यवस्थेला चिंचवडमधून आव्हानमोशी दुर्घटनेप्रकरणी केवळ निलंबन ही मलमपट्टी; कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या युतीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांचा थेट हल्ला
Home पिंपरी चिंचवड मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे पडसाद; महासभेचे मुख्य प्रवेशद्वार रोखून विरोधकांचे महापालिकेत भव्य ठिय्या आंदोलन

मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे पडसाद; महासभेचे मुख्य प्रवेशद्वार रोखून विरोधकांचे महापालिकेत भव्य ठिय्या आंदोलन

९ मृत कामगारांच्या शोकाकुल कुटुंबांना १ कोटींच्या मदतीची मागणी; लष्कर आणि अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेत प्रचंड उद्रेक! काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व मनसेचे सर्वसाधारण सभेच्या प्रवेशद्वारावर ‘ठिय्या आंदोलन’; जोरदार घोषणाबाजीने मनपा भवन दणाणले

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, १५ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मोशी कचरा डेपो येथील अनधिकृत इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील ९ निष्पाप कामगारांच्या मृत्यूचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अत्यंत तीव्रतेने उमटले. या भीषण दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करावे आणि संपूर्ण प्रकरणाची ‘SIT’ चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने संयुक्तपणे ऐतिहासिक आणि आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी थेट महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे मुख्य प्रवेशद्वार अडवून धरल्याने आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण मनपा भवन दणाणून गेले होते. या आंदोलनात विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, शेकडो कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनाचे नेतृत्व करताना मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, “मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या आवारात उभी राहिलेली ती ‘जी प्लस टू’ (G+2) इमारत पूर्णपणे अनधिकृत होती. ही केवळ एक ‘दुर्घटना’ नसून, महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि भ्रष्ट कारभारामुळे झालेला हा थेट मनुष्यवध आहे. दोषींना पाठीशी घालणारे प्रशासन अजूनही मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.”

ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक चळवळीचे नेते मानवजी कांबळे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले, “प्रशासकीय चुकांमुळे अशा दुर्घटना घडणे आणि निष्पाप लोकांचा जीव जाणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने त्या गरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या हानीला जबाबदार असणाऱ्या अँटोनी लारा कंपनीचे वरिष्ठ संचालक, निलंबित मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.”

माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते मारुती भापकर यांनी बचावकार्यात सहभागी झालेल्या यंत्रणांचे आभार मानत प्रशासनाला इशारा दिला. ते म्हणाले, “मलब्याखाली अडकलेल्या कंत्राटी कामगारांना बाहेर काढण्यासाठी आपले अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस दल आणि भारतीय सेनेच्या शूर जवानांनी रात्रंदिवस जीवाची बाजी लावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे १५ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र, प्रशासनाच्या चुकीमुळे ९ जणांना जीव गमवावा लागला. ही अक्षम्य चूक असून आता प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांचे तातडीने पुनर्वसन करावे; अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.”

काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी या प्रकरणात थेट भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, “कचऱ्याचा महाकाय डोंगर अत्यंत धोकादायक आणि कोसळण्याच्या स्थितीत असतानाही त्याजवळ काम का सुरू ठेवण्यात आले? त्या अनधिकृत ‘G+2’ इमारतीला महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याने आणि कोणाच्या सांगण्यावरून परवानगी दिली? या संपूर्ण काळ्या कारभाराला जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट मनुष्यवधाचा आणि खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले पाहिजे.”

शिवसेनेचे (उबाठा) शहर प्रमुख चेतन पवार यांनी आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करत पुढील मागण्यांवर ठाम असल्याचे सांगितले. १.या संपूर्ण भ्रष्टाचाराची आणि निष्काळजीपणाची उच्चस्तरीय तांत्रिक ‘SIT’ (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी व्हावी. २. जबाबदार पालिका अधिकारी व कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. ३.मृत कामगारांच्या शोकाकुल कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची तातडीची नुकसानभरपाई मिळावी. ४. जखमी कामगारांच्या उपचाराचा सर्व खर्च पालिकेने करून त्यांना भरीव आर्थिक मदत करावी. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी दिवंगत ९ कंत्राटी कामगार बांधवांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

काँग्रेस पक्ष: शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्यासह माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, जितेंद्र छाबडा, हरीश डोळस, विल्यम साळवी, राहुल शिंपले, विवेक विधाते, प्रवीण कांबळे, आलोक लाड, देवदत्त रानवडे, सूरज गायकवाड, अक्षय कसबे आदी उपस्थित होते. शिवसेना (उबाठा): शहर प्रमुख चेतन पवार यांच्यासह रोमी संधू, कैलास नेवासकर, ज्ञानेश्वर शिंदे, अनिल सोमवंशी, पार्श्व गुरव, गणेश आहेर, दत्ताराम साळवी, नितीन घोलप, शैलेश मोरे, ऋषिकेश जाधव, रवी मांडवे, शरद जगदाळे, अमोल भालेकर, विकास एकशिंगे, प्रवीण राजपूत, कल्पना शेटे, वैशाली काटकर, वैशाली कुलथे, योगिनी मोहन, तसलीम शेख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसे पक्ष: शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह सचिव रुपेश पटेकर, उपाध्यक्ष बाळा दानवले, राजू सावळे, विक्रम भोसले, नितीन सूर्यवंशी, मनोज लांडगे, आदिती चावरिया, सचिन भवार, सागर बहुले, प्रतीक कांबळे आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!