भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक संपन्न; पदवीधर मतदार नोंदणी आणि ५ हजार रक्तदानाचा टप्पा गाठण्याचे आवाहन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, १९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यात आगामी काळातील दिशा निश्चित करण्यासाठी आणि पक्षाच्या विविध मोहिमांना गती देण्यासाठी आज पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची महत्त्वपूर्ण महाबैठक पार पडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी १० वाजता कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे या भव्य जिल्हा महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत आगामी काळातील पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या नियोजनावर विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर मतदार नोंदणीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरासाठी पक्षाने किमान ७५,००० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी शहरातील प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.”
केवळ ऑनलाइन नोंदणी करणे पुरेसे नसून, मतदारांची अचूक कागदपत्रे आणि त्यांची ‘हार्ड कॉपी’ मध्यवर्ती कार्यालयात वेळेत जमा करण्याची जबाबदारी संबंधितांवर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेच्या प्रगतीचा दररोजचा आढावा घेण्यासाठी एक विशेष ‘चार्ट’ तयार करून तो जिल्हाध्यक्ष आणि गटनेत्यांकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येत्या २० ऑगस्ट २०२६ पर्यंत ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, या कामातील सक्रिय सहभागाचा उपयोग भविष्यात पदे आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपावेळी मुख्य निकष म्हणून केला जाईल, असा महत्त्वपूर्ण इशाराही चव्हाण यांनी यावेळी दिला.
आगामी रक्तदान मोहिमेबाबत बोलताना प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख बाटल्या रक्त संकलनाचा संकल्प पक्षाने केला आहे. या महाअभियानात पिंपरी-चिंचवडचा वाटा म्हणून किमान ५,००० रक्तदानाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
“कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे मोठे फ्लेक्स लावून किंवा अनावश्यक जाहिरातबाजीवर वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यात स्वतःला झोकून द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेत शहरातील सर्व ४ सरचिटणीस, १४ मंडळांचे अध्यक्ष, २० पदाधिकारी आणि १०५ सदस्यांनी पूर्ण समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीत भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, नगरसेवक आणि संघटना हे वेगळे घटक नसून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. बीएलए-२ (BLA-2) चे काम पूर्ण झाले असले तरी, मतदारांचे मॅपिंग अद्याप अपेक्षित गतीने झालेले नाही. त्यामुळे पुढील १८ दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गल्लीबोळात सक्रिय व्हावे. पिंपरी-चिंचवडसारख्या सुशिक्षित शहरात पदवीधर मतदानाचा टक्का वाढवणे हे आपले ध्येय असून, पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हे दोन्ही उपक्रम निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या जिल्हा महाबैठकीस भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आ. महेशदादा लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. शंकरशेठ जगताप, आ. अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशालीताई खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पदवीधर नोंदणी प्रमुख राजेशजी पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व मंडलाध्यक्ष, सर्व मोर्चे, आघाडी, प्रकोष्ठ, सेल यांचे अध्यक्ष, तिन्ही विधानसभांचे BLA-1 आणि मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या महाबैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले, सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले तर सरचिटणीस विकास डोळस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

