news
Home पिंपरी चिंचवड इराणी कॅफेबाहेर वाकड पोलिसांचा मोठा सापळा; ४४ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अतुल आमले अखेर जाळ्यात

इराणी कॅफेबाहेर वाकड पोलिसांचा मोठा सापळा; ४४ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अतुल आमले अखेर जाळ्यात

पोलीस उप-आयुक्त प्रदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड तपास पथकाची पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धडाकेबाज कामगिरी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वाकड पोलिसांची सराईत चोरांवर मोठी कारवाई! अट्टल घरफोडी बहाद्दर ‘आट्या’सह ४ गुन्हेगारांना अटक; १० लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त अन् ५ गुन्हे उघड

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १९ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांविरोधात वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे. उत्कर्ष चौक, वाकड येथील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या एका अत्यंत सराईत गुन्हेगाराला त्याच्या ३ साथीदारांसह अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील तब्बल ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून १० लाख ३४ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वाकड येथील उत्कर्ष चौकातील एका बंद फ्लॅटमध्ये १ जुलै ते १० जुलै २०२६ दरम्यान घरफोडी झाली होती. चोरांनी फ्लॅटच्या दरवाजाचे लॅच-लॉक तोडून आत प्रवेश केला आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.

घरफोडी झाली तो फ्लॅट १० दिवस बंद असल्याने घटनेची अचूक वेळ निश्चित करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वाकड तपास पथकाने परिसरातील तब्बल १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. त्यावरून आरोपींचा येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला. पोलीस हवालदार बंडू गिरे यांनी आपल्या खासगी बातमीदारांमार्फत मुख्य आरोपीचे नाव शोधून काढले. त्यानंतर सपोनि. अंबरीश देशमुख व सपोनि. श्रीनिवास दराडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचला.

मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे तपास पथकाने १७ जुलै २०२६ रोजी इराणी कॅफे (वाकड) जवळून मुख्य आरोपी अतुल उर्फ आट्या चंद्रकांत आमले (वय ३० वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वे रोड, वारजे, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले.

‘आट्या’ची कसून चौकशी केली असता, या गुन्ह्यातील त्याच्या इतर ३ साथीदारांची नावे समोर आली. पोलिसांनी तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून उर्वरित आरोपींनाही बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेले साथीदार १. मोहन उर्फ आबा जनार्दन गुंजमले (वय ३८ वर्षे, रा. सम्राट चौक, वाकड, पुणे), २. भिमराव बापुराव गंगावणे (वय ३८ वर्षे, रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, दत्त मंदिर रोड, वाकड, पुणे), ३. रामेश्वर शिवाजी उपल्ले (वय २४ वर्षे, रा. रायवाडी, ता. चाकूर, जि. लातूर)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अतुल उर्फ आट्या चंद्रकांत आमले (मूळगाव- आमलेवाडी, घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे) हा रेकॉर्डवरील अट्टल घरफोडी बहाद्दर आहे. त्याच्यावर एकट्या पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि लातूर येथे मिळून तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत.

या टोळीकडून ९७.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाकड पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ३४७/२०२६, १३०/२०२६, १७२/२०२६, १८४/२०२६ आणि २१०/२०२६ हे पाच गुन्हे उघड झाले आहेत. या आरोपींनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात आणखीही अनेक घरफोड्या केल्याची दाट शक्यता असून, दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास सपोनि. श्रीनिवास दराडे करत आहेत.

सदरची यशस्वी कारवाई परिमंडळ-२ चे पोलीस उप-आयुक्त प्रदिप जाधव आणि वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अंबरीश देशमुख, सपोनि. श्रीनिवास दराडे, सपोफौ. संदीप गवारी, पोलीस हवालदार बंडू गिरे, दिपक साबळे, विजय घाडगे, हनुमंत कांबळे, विजय भुसारे, सचिन गायकवाड, पोलीस अंमलदार ज्ञानदेव झेंडे, कौर्तेय खराडे, विक्रम भगत, समाधान कांबळे, अभिषेक मांडे, प्रमोद मायके आणि मंगेश लोखंडे (परिमंडळ-०२) यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!