news
Home अमरावती वर्गात संविधानाचे धडे अन् मतदानात आमिषे?; अमरावती शिक्षक मतदारसंघ २०२६ च्या तोंडावर शिक्षकांसाठी वैचारिक मंथन

वर्गात संविधानाचे धडे अन् मतदानात आमिषे?; अमरावती शिक्षक मतदारसंघ २०२६ च्या तोंडावर शिक्षकांसाठी वैचारिक मंथन

"शिक्षक हीच जात अन् सजगता हाच धर्म"; शिक्षकांनी स्वाभिमानी प्रतिनिधी निवडण्याचे डॉ. दिपक घोडेकर यांचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘शैक्षणिक क्षेत्रातील उदासीनतेला शिक्षकच जबाबदार?’ — अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर विचार करायला लावणारा विशेष लेख

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन , २४ जुलै २०२६:

“शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे,” हे वाक्य आपण नेहमीच अभिमानाने उच्चारतो. परंतु, आज शिक्षण व्यवस्था अभूतपूर्व संकटातून जात असताना एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित होत आहे — “शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या उदासीनतेला, शिक्षणाच्या अधोगतीला आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबतच्या निष्क्रियतेला शिक्षक स्वतः जबाबदार आहेत का?”

भारतीय राज्यघटनेने शिक्षकांना केवळ अध्यापनाचे दायित्व दिलेले नाही, तर सामाजिक प्रतिनिधित्वही दिले आहे. त्यांच्या प्रश्नांना लोकशाही पद्धतीने मांडण्यासाठी विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली. महाराष्ट्रातील सात शिक्षक मतदारसंघ ही त्याच दूरदृष्टीची देण आहे. या मतदारसंघातून निवडून जाणारा प्रतिनिधी हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसून संपूर्ण शिक्षक समाजाचा अभ्यासू, संघर्षशील आणि प्रामाणिक आवाज असणे अपेक्षित असते.

मात्र, गेल्या काही वर्षांत हक्काचा शिक्षक मतदारसंघ हा शिक्षकांच्या प्रश्नांचा मंच राहिला आहे की राजकीय पुनर्वसनाचे केंद्र बनत चालले आहे? आर्थिक ताकद, राजकीय पाठबळ किंवा गटबाजीच्या बळावर उमेदवारी मिळविणाऱ्यांची संख्या वाढल्याने हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाची २०२६ ची निवडणूक अत्यंत जवळ आली आहे. ही केवळ एका आमदारकीची निवडणूक नसून पुढील ६ वर्षांसाठी शिक्षकांच्या भवितव्याची आणि त्यांच्या अधिकारांची दिशा ठरवणारी लढत आहे.

आपण कोणाला निवडून देणार? शिक्षण क्षेत्रातील वेदना जाणणाऱ्या अभ्यासू शिक्षकाला की निवडणुकीला केवळ राजकीय संधी मानणाऱ्या व्यक्तीला? शिक्षकांच्या सेवा-सुरक्षा, पेन्शन, धोरणे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा अभ्यास असणाऱ्याला की केवळ पैशाच्या आणि प्रचारयंत्रणेच्या जोरावर पुढे आलेल्या उमेदवाराला? नातेसंबंध, जात, पक्ष किंवा क्षणिक आमिषांना बळी पडून केलेला चुकीचा निर्णय संपूर्ण शिक्षक समाजाला ६ वर्षे भोगावा लागतो, याचे भान आपण ठेवणार का? शिक्षकांनी स्वतःला विचारायचे काही मूलभूत प्रश्न आहेत.

विद्यार्थ्यांना आपण वर्गात संविधान, लोकशाही, प्रामाणिकपणा, सामाजिक न्याय आणि भ्रष्टाचारमुक्तीचे धडे देतो. परंतु स्वतःच्या मतदानात आणि भूमिकेत जर ती मूल्ये दिसणार नसतील, तर आपण विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहोत?

आज शिक्षण क्षेत्रासमोर शिक्षकांची रिक्त पदे, जुनी पेन्शन योजना, वाढता प्रशासकीय ताण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (NEP) विसंगती, अनुदानाचा प्रश्न, संशोधनाची घसरती गुणवत्ता आणि शिक्षणाचे व्यापारीकरण यांसारखी गंभीर आव्हाने उभी आहेत. यावर सातत्याने आवाज उठवणारा प्रतिनिधी केवळ शिक्षकांच्या सजग मतदानातूनच घडतो.

२०२६ च्या या निवडणुकीत शिक्षकांनी जात, धर्म, पक्ष, गटबाजी आणि पैशाच्या प्रभावापलीकडे जाण्याची तातडीची गरज आहे. शिक्षकांनी एकच स्वाभिमानी ओळख स्वीकारली पाहिजे: “शिक्षक हीच माझी जात, सजगता हाच माझा धर्म आणि शिक्षणसेवा हाच माझा संकल्प.”

कारण शिक्षक जागा झाला तरच समाज जागा होईल आणि लोकशाही सशक्त होऊन शिक्षण व्यवस्था परिवर्तनाचे खरे माध्यम बनेल. प्रत्येक शिक्षकाने आज स्वतःला विचारले पाहिजे — “मी केवळ एक मतदार आहे, की शिक्षण व्यवस्थेचा जबाबदार शिल्पकार?”

  • लेखक: डॉ. दिपक घोडेकर, कळंब (मो. ९४०३२ ५३३२५)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!