मुंबई-बेंगळुरूमधून आरोपींना बेड्या, अन् बिहारमधून १४ तोळे सोने जप्त! उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची घरफोडी प्रकरणातील धडाकेबाज कामगिरी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तब्बल चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुंबई व बेंगळुरू येथून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी बिहारमधील मूळ गावी लपवून ठेवलेले १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने यशस्वीरीत्या जप्त केले आहेत.
मौजे महाळुंगे इंगळे (ता. खेड, जि. पुणे) येथील भाजी विक्रेत्या सौ. कविता मदन कड या आपल्या दुकानाचा गाळा बंद करून मूळ गावी यात्रेसाठी गेल्या होत्या. हीच संधी साधून ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २:०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानातील कपाटातून सोन्याचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०७/२०२६ (भा.न्या.स. कलम ३३१(३), ३०५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरातून मोठ्या प्रमाणावर दागिने चोरीला गेल्याने पोलीस उप-आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे आणि पथकाने सीसीटीव्ही व गोपनीय बातमीदारांमार्फत तपास सुरू केला.
पोलीस अंमलदार संतोष काळे व शुभम खंडागळे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुख्य आरोपी निक्कुकुमार सिंग हा सर्व सोने घेऊन बिहारला पळून गेला होता आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी बिहार, मुंबई व कर्नाटक (बेंगळुरू) येथे लपून राहत होता. त्याला सोने लपवण्यासाठी त्याचा भाऊ रंजन सिंग मदत करत होता. सलग ४ महिने तांत्रिक विश्लेषण आणि विविध मार्गाने पाठपुरावा करत सपोनि कल्याण घाडगे यांच्या पथकाने रंजन सिंग याला मुंबईतून तर मुख्य आरोपी निक्कू सिंग याला बेंगळुरूमधून बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीनंतर पोलीस पथकाने थेट बिहारमधील सीतामढी गाठून लपवून ठेवलेले १२ लाख ६० हजार रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) निक्कुकुमार देवकी सिंग (वय २२ वर्षे, रा. ब्लॉक भाऊर, जि. सीतामढी, बिहार)
२) रंजनकुमार देवकी सिंग (वय २० वर्षे, रा. ब्लॉक भाऊर, जि. सीतामढी, बिहार)
३) राजकुमार उर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (वय १९ वर्षे, रा. रोहतास, बिहार)
४) डिंपल पटेल विनोद सिंग (वय २६ वर्षे, रा. नसेज, जि. केगल भबुआ, बिहार)
सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सपोनि कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राज कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, मंगेश कदम, हरी रणदिवे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर, समीर महात आणि सह. फौजदार तुकाराम घुगे यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
