‘ग्यानबा-तुकाराम’ च्या जयघोषाने शिवार चौक भक्तिमय! न्यू सिटी प्राइड स्कूलमध्ये ग्रंथदिंडी व ‘निर्मल वारी’ सोहळा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे उलगडले संतांचे महात्म्य
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून भव्य ‘ग्रंथदिंडी’ व ‘निर्मल वारी’ सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकऱ्यांचा वेश परिधान करून सहभाग घेतला होता. “ग्यानबा-तुकाराम” आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण शिवार चौक आणि परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते ग्रंथपूजन आणि दिंडी पूजनाने झाली. या प्रसंगी डॉ. अभिजित कोकणे, डॉ. प्रियंका कोकणे, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीमध्ये अनेक विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठूनामाचा जयजयकार करत होत्या, तर विद्यार्थी गळ्यात टाळ अडकवून “ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली” असा गजर करत होते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठल-रुक्मिणीची सुरेख वेशभूषा केलेल्या बाल-वारकऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणाही दिल्या. ही दिंडी शाळेपासून निघून शिवार चौकातून परत शाळेत आली.
शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला का जातात, याविषयी एक सुंदर नाटिका सादर केली. ‘वैष्णव धर्म हा समाज प्रबोधनाचा धर्म असून सर्व संतांनी जगाला सत्य, करुणा आणि चांगुलपणाचा मार्ग दाखवला,’ हे अनेक उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांनी नाटकातून उलगडले. यासोबतच विद्यार्थ्यांनी सादर केलेले भारुड आणि अभंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘पसायदानाने’ कार्यक्रमाची सांगता होऊन सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा पाठीचा कणा मानली जाते. या दिवशी हजारो वारकरी शेकडो मैलांचा प्रवास पायी करत पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर विठूरायाच्या दर्शनासाठी एकत्र येतात. आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून जात, पात, धर्म आणि वर्गभेद विसरून समाजाला एकत्र आणणारा ‘समतेचा सोहळा’ आहे. वारकरी संप्रदायाने जगाला दिलेली भूतदया, पर्यावरण रक्षण, स्वच्छता (‘निर्मल वारी’) आणि नीतिमत्तेची मूल्ये आजच्या युवा पिढीमध्ये रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे आणि आषाढी एकादशीचे खऱ्या अर्थाने महात्म्य समजते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी न्यू सिटी प्राइड स्कूलच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


