“माता, भगिनी, भाऊ सर्वांनी रस्त्यावर या, मोदीला घालवा!” — माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे थेट आवाहन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पिंपरीत काँग्रेसचा ‘न्याय-विजय सोहळा’ साजरा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपर फुटी प्रकरणाविरोधात तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पिंपरी चौकात कॅन्डल मार्च आणि सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनाच्या काही वेळ आधीच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे, तसेच आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे या आंदोलनाचे रूपांतर ‘न्याय-विजय महोत्सवात’ झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आणि घोषणाबाजी करत संविधान आणि विद्यार्थी आंदोलनाचा भव्य विजय साजरा केला.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले:
“आपण शिकलेले लोक आवाज उठवू लागलो म्हणून या सरकारने सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळा सुरू केल्या. गरिबांची मुले आई-वडिलांच्या काबाडकष्टाच्या पैशांवर मोठ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात; परंतु त्यांचे पेपर फोडून त्यांना नाउमेद करण्याचे काम सध्याचे मोदी सरकार करत आहे. ज्यांनी स्वातंत्र्याला, मुलींच्या शिक्षणाला, आरक्षणाला आणि संविधानाला विरोध केला, ती मंडळी शिक्षण व्यवस्था नीट चालवूच शकत नाहीत.”
ते पुढे म्हणाले,
“घराघरात बसलेल्या माझ्या सर्व माता, भगिनी आणि भावांनी आपल्या मुलाबाळांसह रस्त्यावर उतरावे. या सरकारला घालवल्याशिवाय आणि पंतप्रधान मोदींचा राजीनामा घेतल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. देशातील तरुणांनी आणि पालकांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे.”
पिंपरी चौकात ‘न्याय विजय’ या अक्षरांच्या आकाराने मेणबत्त्या प्रज्वलित करत काँग्रेसने आनंद व्यक्त केला. शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले की:
“हा विजय देशातील लढवय्या आंदोलक विद्यार्थ्यांचा, युवकांचा आणि राहुल गांधी यांच्या सक्षम आणि संघर्षशील नेतृत्वाचा विजय आहे. सत्याग्रहापुढील आणि संविधानापुढील ही हुकूमशाहीची हार आहे.”
या विजय सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश सचिव अशोक मोरे, प्रदेश क्रीडा विभागाच्या अध्यक्षा समिता गोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव स्वप्नील बनसोडे, प्रदेश विचार विभागाचे युवक अध्यक्ष राहुल शिंपले, माजी सचिव गौतम आरकडे, सेवा दलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला नेत्या स्वाती शिंदे, युवक काँग्रेस सरचिटणीस करण गील, आप्पासाहेब सोनवणे, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, हरीश डोळस, कुणाल भोसले, विवेक विधाते, विल्यम साळवी, सिद्धार्थ वानखेडे, युवराज पवार, अमोल कुडे, अकबर शेख, मोहम्मद कबीर, समरीन कुरेशी, आर्या बोचकुरे, विजय ओव्हाळ, जितेंद्र छाबडा, राजू वाल्मिकी, नितीन सोनवणे, रितिका शर्मा, वैशाली पवार, विलास सकट, बाबा गायसमुद्रे, नासिर चौधरी यांसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


