टाळांचा गजर, फुगड्या अन् विठ्ठल नामाचा जयघोष! वाकडमध्ये आनंद ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: आषाढ महिना म्हणजे हर्ष, उल्हास आणि विठ्ठल नामाचा महिमा! देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शनिवारी (२५ जुलै २०२६) वाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत संघातील महिला व पुरुष सभासद मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
सकाळी ९:०० वाजता स्थानिक राम मंदिरापासून या दिंडीला अतिशय उत्साहात सुरुवात झाली. पुरुष सभासदांच्या हातात फडकत असलेल्या वारकरी पताका, महिला सभासदांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, माऊलींची मूर्ती आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती हे या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. हातात टाळ आणि मुखात “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”चा जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. नगरप्रदक्षिणेदरम्यान महिलांनी विविध अभंग, भजने, गवळणी आणि भारुड सादर केले. ठिकठिकाणी महिलांनी घातलेल्या फुगड्या आणि धरलेला फेर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
विशेष म्हणजे, दिंडी फेरी सुरू असताना काही काळ वरुणराजानेही विश्रांती घेतली होती. दिंडी पुनःश्च राम मंदिरामध्ये दाखल होताच पाऊस सुरू झाला, जणू काही वरुणराजानेही या दिंडीवर जलाभिषेक करून आपला आनंद व्यक्त केला. राम मंदिरामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची रीतसर आरती आणि मंत्रोपचार पार पडले. त्यानंतर उपस्थित सर्व वारकरी व सभासदांना गरम चहा आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यास आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला व पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि उत्साही वातावरणात या आषाढी एकादशी सोहळ्याची अतिशय मंगलमय वातावरणात सांगता झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


