डॉ. पी. डी. पाटील कुलपती यांना ‘शिक्षण महर्षी’ पुरस्कार प्रदान; आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे पिंपरीत गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान, २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित भव्य दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना “शिक्षणमहर्षी” या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. या सोहळ्यास आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमाताई खापरे यांच्यासह हजारो वारकरी, कामगार व मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी डॉ. पी. डी. पाटील यांच्या चार दशकांहून अधिक काळातील अथांग शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. डी. वाय. पाटील संस्थेमुळे हजारो सर्वसामान्य, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते, आयटी तज्ज्ञ बनून देश-विदेशात यशस्वी झाले आहेत. या वेळी भोसले यांनी सोशल मीडियातील पत्रकारांसाठी डी. वाय. पाटील संस्थेत विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची आणि पत्रकारांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील भावुक झाले. ते म्हणाले:
“मी गेली ४५ वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण क्षेत्रात अविरत काम करत आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रेरणेने या संस्थेचा विस्तार करण्याची संधी मिळाली. आज जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या संस्थेचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असून याचे सर्व श्रेय माझ्या सहकाऱ्यांना आणि समाजाला जाते.”
चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पिंपरी-चिंचवडची शैक्षणिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात डी. वाय. पाटील संस्थेचा मोठा वाटा आहे. तसेच श्रमिक आणि वारकरी संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणल्याबद्दल त्यांनी यशवंतभाऊ भोसले यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. माजी खासदार अमर साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत, “पी. डी. पाटील यांनी शिक्षणाची खरी पंढरी उभी करून हजारो पिढ्या घडवल्या, हीच खरी राष्ट्रसेवा आहे,” असे उद्गार काढले.
या सोहळ्यास भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतभाऊ भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, दिपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओंकार देशपांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
