news
Home अमरावती मेळघाटात बालविवाह रोखण्यासोबत १,००० दिवसांच्या पोषक आहारावर भर; अंगणवाड्या सौर ऊर्जेने उजळणार

मेळघाटात बालविवाह रोखण्यासोबत १,००० दिवसांच्या पोषक आहारावर भर; अंगणवाड्या सौर ऊर्जेने उजळणार

गंभीर कुपोषणाची आकडेवारी १०० च्या आत आणण्याचे प्रशासनाला आदेश; मंत्री आदिती तटकरेंनी साधला आदिवासींशी थेट संवाद | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी शासन कटिबद्ध; अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करणार अन् १००० दिवसांच्या आहाराचे नियोजन होणार — महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अमरावती/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी जयकुमार चर्जन, २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांतील कुपोषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, तो कायमस्वरूपी नियंत्रित करण्यासाठी राज्य शासन ठोस व सकारात्मक पावले उचलत आहे. आगामी काळात माता व बालसंगोपनासाठी विविध नवनवीन उपाययोजना राबवून मेळघाटातील कुपोषण मुळापासून उपटून टाकण्यावर सरकारचा भर असेल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

धारणी येथील तहसील कार्यालयात मेळघाटातील विविध समस्या आणि विकासकामांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. या आढावा बैठकीस प्रभुदास भिलावेकर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, महिला बालविकास उपायुक्त विलास मसराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे यांनी मेळघाटातील कुपोषणाची मुख्य कारणे आणि त्यावरील उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले. मेळघाटात बालविवाहाचे प्रमाण असल्याने कमी वयात मातृत्व येऊन कुपोषित बालके जन्माला येतात. यावर मात करण्यासाठी स्थानिक आदिवासी भाषेत आरोग्यविषयक माहिती व पोषक आहाराचे मार्गदर्शन देणाऱ्या महिला सेविकांची निवड करून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.  बाळ जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या १,००० दिवसांच्या आहाराचे विशेष नियोजन केले जाणार आहे, ज्यामुळे कुपोषित बालकांचा जन्म टाळता येईल.

मेळघाटातील बालकांना व मातांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी निर्णय घेण्यात आले. अंगणवाड्यांमध्ये विजेसाठी सोलार यंत्रणा, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. गरोदर मातांना मिळणारा पोषक आहार त्यांनी अंगणवाडीतच ग्रहण करावा, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच दर्जेदार आहारासाठी स्थानिक ‘आहार समित्या’ अधिक सक्रिय केल्या जातील. जिल्हा नियोजन समितीचा (DPDC) अंगणवाडी बांधकामाचा निधी एका वर्षाच्या आत खर्च करावा. अन्यथा बांधकाम विभागाला (PWD) एजन्सी म्हणून नियुक्त करून कामे वेगाने पूर्ण करावीत.

आदिवासी नागरिकांच्या मनात आरोग्य यंत्रणेबाबत असलेले गैरसमज दूर करून, रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक प्रसूती (Natural Delivery) होण्यावर भर दिला जाईल. यामुळे आदिवासींमधील सिझर शस्त्रक्रियेची भीती कमी होईल. महिला दिनानिमित्त होणाऱ्या विशेष ग्रामसभांमधून महिला आणि आदिवासींसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल.

मेळघाटातील मध्यम तीव्र कुपोषण (MAM) आणि गंभीर तीव्र कुपोषण (SAM) या दोन्ही घटकांवर तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. विशेषतः गंभीर तीव्र कुपोषणाची (SAM) आकडेवारी १०० च्या आत आणण्यासाठी प्रशासनाने युद्धापातळीवर प्रयत्न करावेत, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, आपल्या मेळघाट दौऱ्यादरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी भोकरबर्डी, धुळघाट, कळमखार, लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन बालके, माता आणि आदिवासी बांधवांशी आपुलकीचा संवाद साधला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!