news
Home अमरावती धारणीतील आश्रमशाळेतील अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली परिस्थितीची माहिती

धारणीतील आश्रमशाळेतील अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली परिस्थितीची माहिती

आरोग्य पथक आणि औषधसाठा तैनात; ७० विद्यार्थ्यांवर उपचार यशस्वी, इतर शाळांमधील भीतीचे वातावरण दूर करण्याचे प्रयत्न | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

टिटंबा आश्रमशाळेतील सर्व ७० विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन!

अमरावती/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी जयकुमार चर्जन , २७ जुलै २०२६:

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय निवासी आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झालेल्या सर्व ७० विद्यार्थ्यांची प्रकृती आता पूर्णपणे बरी असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, या घटनेनंतर भीतीपोटी आणि अफवांमुळे इतर शाळांमधील विद्यार्थीही पोटदुखीच्या तक्रारी करत आहेत. तपासणीअंती इतर विद्यार्थ्यांना कोणताही आजार झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून, पालक आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिटंबा येथील शासकीय आश्रमशाळेत २५ जुलै रोजी सायंकाळी जेवण केल्यानंतर सुमारे ७० विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकांची व्यवस्था करून बाधित ७० विद्यार्थ्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि बरी आहे.

टिटंबा येथील घटनेनंतर तालुक्यातील इतर आश्रमशाळांमधील काही विद्यार्थी घाबरून पोटदुखी आणि अतिसार झाल्याचे सांगत होते. आरोग्य पथकाद्वारे या सर्व विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली असता, त्यांना कोणताही आजार किंवा अन्नातून विषबाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. केवळ आदल्या दिवशीच्या घटनेच्या भीतीमुळे आणि अफवांमुळे विद्यार्थी आरोग्याच्या तक्रारी करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

खबरदारीचा उपाय म्हणून टिटंबा येथील शासकीय आश्रमशाळेत उर्वरित विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी एक विशेष वैद्यकीय पथक, पुरेसा औषधसाठा आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA), पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे आश्रमशाळेतील अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

“उपजिल्हा रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या सर्व ७० विद्यार्थ्यांची प्रकृती पूर्णपणे बरी असून कोणाच्याही जीविताला कोणताही धोका नाही. संपूर्ण परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करावे.”

— आशिष येरेकर (जिल्हाधिकारी, अमरावती)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!