news
Home पिंपरी चिंचवड यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत रंगली श्रमिकांची आषाढी दिंडी; आचार्य अत्रे रंगमंदिरात सांगता

यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत रंगली श्रमिकांची आषाढी दिंडी; आचार्य अत्रे रंगमंदिरात सांगता

आमदार शंकर जगताप अन् अमर साबळे यांची हजेरी; विठू नामाच्या जयघोषाने भक्तिमय झाले पिंपरी शहर | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी व श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत भव्य दिंडी सोहळा आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम नगर येथून सलग दुसऱ्या वर्षी निघालेल्या या दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. आचार्य अत्रे रंगमंदिर येथे या दिंडीची व मेळाव्याची सांगता झाली.

या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, अबोलीताई पिसाळ यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतभाऊ भोसले यांनी आषाढी एकादशीचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व सांगताना भक्त पुंडलिकाच्या आदर्शाचे स्मरण केले. ते म्हणाले:

“आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे. आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नसून भक्ती, सेवा, समता आणि संस्कारांचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. संतांची हीच शिकवण श्रमिकांपर्यंत पोहोचावी आणि श्रमिकांमध्ये ऐक्य निर्माण व्हावे, याच उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.”

संत तुकाराम नगर पुतळा येथून प्रस्थान झालेली ही दिंडी महेश नगर, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गंगानगर, श्री दत्त मंदिर, हनुमान मंदिर, श्री गणेश मंदिर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, मारुती मंदिर आणि शनी मंदिर मार्गे ३ किलोमीटरचा पायी प्रवास करत आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पोहोचली.

दिंडीत “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. पारंपरिक वेशभूषेत वारकरी फुगड्या खेळत आणि अभंग गात पुढे जात होते. दिंडीतील सुशोभित रथात लहान मुलांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची साकारलेली रूपे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. ठिकठिकाणी नागरिकांनी रांगोळ्या काढून व फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत केले.

दिंडीचे संपूर्ण नियोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी स्वतः लक्ष घालून केले. संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांच्या सुविधा, शिस्त, वाहतूक व्यवस्था, पाणी, वैद्यकीय मदत आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी ते स्वतः कार्यकर्त्यांसह धावपळ करताना दिसले. उपस्थितांनी या नेटक्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतभाऊ भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील, दिपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओमकार देशपांडे, ओंकार जोखारे, अप्पू नायर, अंकुश वाघमारे, मानसी देशपांडे, आरतीताई पराळे, इस्मात भाभी सय्यद, शालन महापुरे, संतोषी चौधरी, गणेश बुलदगड, विनायक निकम, श्रेयस करे, मल्लेश पोरवी, फौजदार गायकवाड, आप्पासाहेब माने, महेश भुते, सुधाकर शिंदे, सतीश सासवडे तसेच संत तुकाराम नगर सहकारी रचना मर्यादित सर्व कार्यकारणी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!