सांगवी विकास मंचतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: सांगवी येथील ‘सांगवी विकास मंच’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने आज, दि. १ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण भागवत यांनी प्रास्ताविक सादर करत उपक्रमामागील भूमिका मांडली.
या प्रसंगी उपस्थित वक्त्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर व विचारांवर सविस्तर प्रकाश टाकला. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक कंक, खादी ग्रामोद्योग पुणे विभागीय कार्यालयाचे माजी संचालक सुनील पोकरे, ज्येष्ठ समाजसेवक ठाकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सूर्यवंशी, ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बंडोपंत शेळके महाराज, ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी परिसराचे माजी अध्यक्ष अशोकराव भोसले आणि उद्योजक भरतशेठ कुंभार यांनी आपले विचार व्यक्त केले.
या अभिवादन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक मुरलीधर दळवी, सुवर्णकार समाज समितीचे अध्यक्ष दिलीपकुमार फाकटकर, ज्येष्ठ नागरिक संघ सांगवीचे विद्यमान अध्यक्ष कमलाकर जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन सांगवी विकास मंचचे अध्यक्ष महेशशेठ भागवत यांनी केले होते. उपस्थितांचे आभार मुरलीधर दळवी यांनी मानले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

