news
Home पिंपरी चिंचवड अण्णाभाऊंच्या लेखणीने श्रमिकांना मिळवून दिला सन्मान; कष्टकरी अन् फेरीवाला क्रांती महासंघाचा संयुक्त उपक्रम

अण्णाभाऊंच्या लेखणीने श्रमिकांना मिळवून दिला सन्मान; कष्टकरी अन् फेरीवाला क्रांती महासंघाचा संयुक्त उपक्रम

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान अतुलनीय; पिंपरी चिंचवडमधील कामगार अन् नागरिकांची मोठी उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य अन् संघर्षातून कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली” — कामगार नेते काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समृद्ध साहित्य, आक्रमक शाहिरी आणि सततच्या संघर्षातून श्रमिक, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदनांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले. त्यांच्या धारदार लेखणीने कामगारांच्या श्रमाला समाजात सन्मान व प्रतिष्ठा मिळवून दिली, तर त्यांच्या लोककलेने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना काशिनाथ नखाते म्हणाले,

“अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्यच संघर्षाने व्यापलेले होते. भीषण गरिबी, उपासमार, सामाजिक विषमता आणि भेदभावाचा सामना करत त्यांनी आपल्या साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांच्या लेखणीतून केवळ कथा-कादंबऱ्या जन्माला आल्या नाहीत, तर श्रमिकांच्या वेदना, अन्यायाविरोधातील संघर्ष आणि स्वाभिमानाचा हुंकारही बुलंद झाला.”

अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करताना नखाते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंनी मुंबईच्या गिरणगावातील कामगारांचे जीवन अत्यंत जवळून अनुभवले होते. गिरणी कामगारांचे कष्ट, चाळ संस्कृती आणि मराठी माणसाचा स्वाभिमान त्यांनी आपल्या साहित्यातून व पोवाड्यांतून अजरामर केला. मुंबई ही केवळ उद्योगपतींची नगरी नसून लाखो श्रमिकांच्या घामावर उभी राहिलेली कर्मभूमी आहे, हा विचार अण्णाभाऊंनी जगासमोर ठामपणे मांडला. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंच्या शाहिरीने मराठी अस्मिता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला अभूतपूर्व ऊर्जा दिली.

या अभिवादन कार्यक्रमास लाला राठोड, अनिल कदम, विजय भोसले, कावेरी सेलके, रोहिणी आजबे, राजश्री गायकवाड, लक्ष्मी शेवडे, मनीषा गवळी, वनिता डोंगर, अस्मिता कोळे, विद्या राऊत, रूपा गुंडे, राणी क्षीरसागर यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील कष्टकरी, कामगार आणि फेरीवाले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!