विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; पिंपरी-चिंचवडच्या नेतृत्वाला राज्याच्या राजकारणात मोठी संधी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदाची धुरा पिंपरी-चिंचवड शहरातील तडफदार युवानेते विशाल शंकर वाकडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विशाल वाकडकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. याप्रसंगी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सुप्रिया सुळे विशेष रुपाने उपस्थित होत्या.
विशाल वाकडकर यांनी पक्षासाठी दिलेले दीर्घकालीन योगदान, संघटनात्मक बांधणीतील अत्यंत सक्रिय सहभाग आणि युवा वर्गामध्ये पक्षाची मूळ विचारधारा प्रभावीपणे रुजवण्याच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर युवकांची भक्कम फळी उभारणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील नव मतदारांपर्यंत पोहोचवणे हे शरद पवार गटासमोर मोठे आव्हान होते. अशा वेळी विशाल वाकडकर यांच्यासारख्या अभ्यासू, आक्रमक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची निवड करून पक्षश्रेष्ठींनी एक मास्टरस्ट्रोक मारल्याचे मानले जात आहे.
पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक आणि विविध धर्मीय लोकसंख्या असलेल्या शहरात विशाल वाकडकर यांनी तळागाळातील युवकांना जोडण्याचे मोठे काम केले आहे. विद्यार्थ्यांचे व बेरोजगारांचे प्रश्न, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांच्या माध्यमातून वाकडकर यांचा थेट तरुण वर्गाशी संपर्क आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात युवक संघटना आक्रमकपणे बांधण्यासाठी वाकडकर यांची निवड अत्यंत योग्य व मोक्याची मानली जात आहे.
नियुक्तीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना विशाल वाकडकर म्हणाले:
“पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आदरणीय पवार साहेबांचे विचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आणि घराघरांत पोहोचवणे हेच माझे प्रमुख ध्येय असेल. राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांवर आक्रमक लढा उभारून युवक काँग्रेसचे मजबूत संघटन उभे करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन.”
विशाल वाकडकर यांच्या रूपाने पिंपरी-चिंचवड शहरातील नेत्याला राज्य पातळीवर मोठा बहुमान मिळाल्याने शहरातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. शहरभरात पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून, राजकीय व सामाजिक स्तरातून वाकडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
