लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने निगडीत अभिवादन; अण्णाभाऊंना ‘भारतरत्न’ देण्याची आग्रही मागणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आम आदमी पार्टी (आप), पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याचा गौरव करत केंद्र सरकारकडे त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची जोरदार मागणी केली.
अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आप शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट म्हणाले,
“संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून वंचित, शोषित व कष्टकरी जनतेच्या व्यथांना आणि संघर्षाला वाचा फोडली. ते केवळ साहित्यिक नव्हते, तर महान समाजसुधारक आणि लोककलावंत होते. अशा या थोर लोकशाहिराला केंद्र सरकारने लवकरात लवकर ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. हा सन्मान केवळ अण्णाभाऊंचा नसून, समस्त वंचित घटकांचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा सन्मान ठरेल.”
या अभिवादन कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्यासह संघटन मंत्री सुरेश भिसे, युवा अध्यक्ष विकी पासोटे, युवा उपाध्यक्ष विजय चांदल यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
