अमित शाह यांच्या दौऱ्यात पिंपरी-चिंचवडच्या भाजप पदाधिकाऱ्यांना डावलल्याने तीव्र संताप! ‘स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांसारखी वागणूक’, सचिन काळभोर यांचा घरचा आहेर!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्यंत निंदनीय आणि अपमानकारक प्रकारामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या अनागोंदी कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत पक्षालाच ‘खरमरीत आहेर’ दिला आहे.
पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे आणि स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सदिच्छा भेटीसाठी आणि स्वागतासाठी लोकमान्य टिळक पुरस्कार स्थळावर गेले होते. मात्र, त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवडच्या या प्रमुख लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवावे लागले आणि शेवटी भेट न होताच खाली हाताने माघारी फिरावे लागले.
यादरम्यान माजी खासदार अमर साबळे आणि विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दुय्यम दर्जाची म्हणजेच सामान्य ‘कार्यकर्त्यासारखी’ वागणूक दिली आणि स्वतः मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांच्या भेटीसाठी निघून गेले, असा गंभीर आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे. तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र ज्येष्ठ नेते राहुल कलाटे यांची आवर्जून भेट घेत संवाद साधल्याचे पाहायला मिळाले.
पुणे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अमित शाह यांची भेट सुलभतेने मिळत असताना, पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौर आणि शहराध्यक्षांची सदिच्छा भेट जाणूनबुजून नाकारली जाणे किंवा टाळणे हे अत्यंत खेदजनक आहे.
सदर कार्यक्रम पुणे महापालिकेचा असला तरी पक्षाची एकसंध भूमिका म्हणून पिंपरी-चिंचवडच्या लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक देणे अपेक्षित होते. शहरातील लाखो नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शहराध्यक्ष, महापौर आणि पक्षनेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. परंतु, पक्षातील जबाबदार नेत्यांनाच जर अशा प्रकारे डावलले जात असेल, तर पिंपरी-चिंचवड शहराचे भविष्य टांगणीला लागले आहे, अशीच भावना आता सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पक्षातील या दुहेरी भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढताना सचिन काळभोर म्हणाले:
“पिंपरी-चिंचवडच्या जबाबदार लोकप्रतिनिधींना आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि भविष्यात गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्ष, महापौर, उपमहापौर व पक्षनेत्यांची विशेष सदिच्छा भेट घडवून आणावी. पक्षाच्या वरिष्ठांनी आणि पक्षश्रेष्ठींनी यापुढे अशा प्रकारची गंभीर चूक होणार नाही याची कडक दक्षता घ्यावी!”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
