लोकमान्य टिळक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांना पिंपरी महापालिकेकडून भावपूर्ण अभिवादन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पिंपरी-चिंचवडचे दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित विशेष कार्यक्रमात लोकमान्य टिळक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि दिवंगत मधुकरराव पवळे यांच्या प्रतिमांना, तसेच निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या अभिवादन सोहळ्यास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य निलेश तरस, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, मधुरा शिंदे, ऐश्वर्या तरस, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी नगरसदस्य सचिन चिखले, माजी नगरसदस्या सुमन पवळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. तसेच दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे यांचे नातेवाईक लांडे, सुनिता चोरघे, रेणुका उत्तेकर, ज्योती गवारे, राजलक्ष्मी चोरघे, ओंकार पवळे व विनित गवारे यांनीही या प्रसंगी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समता, परिवर्तन व साहित्य क्षेत्रातील महान कार्याचा आणि माजी महापौर मधुकरराव पवळे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी दिलेल्या बहुमोल योगदानाचा गौरव केला. या महापुरुषांच्या व नेत्यांच्या विचारांचा अन् कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शहर विकासासाठी आणि समाजहितासाठी सदैव कार्यरत राहण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


