भोसरी–दिघी मार्गावरील मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम सुरू; ४ ते ५ दिवस रस्ता बंद राहण्याची शक्यता, पर्यायी मार्ग वापरण्याचे महापालिकेचे आवाहन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भोसरी–दिघी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनासमोरील मुख्य ड्रेनेज वाहिनी चोकअप झाल्यामुळे दिघी (शिवनगर) परिसरातील अनेक घरांमध्ये मैलापाणी शिरण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत, क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी संत निरंकारी सत्संग भवनासमोरील इंद्रधनू सोसायटीसमोरील रस्त्याची खोदाई करण्यात येणार आहे.
काम सुरु असताना नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भोसरी–दिघी मार्गावरील या विशिष्ट टप्प्यातील वाहतूक अंदाजे ४ ते ५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे प्रभाग क्रमांक ४, ५, ६ आणि ७ तसेच भोसरी व दिघी परिसरातील नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दिघी (शिवनगर) परिसरातील मैलापाणी तुंबण्याची आणि घरांमध्ये शिरण्याची समस्या पूर्णपणे निकाली निघणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे काम लवकरात लवकर आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या वतीने आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
“दिघी परिसरातील मलवाहिनीची समस्या गंभीर असल्याने तिचे तातडीने निराकरण करणे आवश्यक होते. काम सुरू असताना नागरिकांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे.”
— परशुराम वाघमोडे (ई क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
