‘घर घर संविधान’ उपक्रमातून ४ लाख विद्यार्थी अन् ८ लाख पालकांपर्यंत पोहोचणार संविधानाचे विचार! — शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: ‘घर घर संविधान’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांपर्यंत आणि ८ लाख पालकांपर्यंत संविधानाची महती पोहोचेल. यातून संविधानधिष्ठित आणि जागृत समाज घडण्यास मदत होईल. असा नाविन्यपूर्ण व दिशादर्शक उपक्रम राबवणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील अग्रगण्य संस्था आहे, असे प्रतिपादन शिक्षण समिती सभापती रविना सागर अंगोळकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ ‘पीसीएमसी पब्लिक स्कूल, वाल्हेकरवाडी’ येथे पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या सोहळ्यात बोलताना विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले,
“संविधानाची मूल्ये आणि उद्देशिकेचा खरा अर्थ बालवयातच मुलांच्या मनावर रुजणे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही, समता आणि बंधुता ही मूल्ये आत्मसात केल्यास उद्याची पिढी अधिक सुसंस्कृत, जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून घडेल.”
तसेच संविधान अभ्यासक व ‘माणगाव पॅटर्न’चे प्रमुख नूर खा पठाण यांनी, “भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक प्रगतीचा दस्तऐवज आहे,” असा विचार मांडला. या उपक्रमांतर्गत दररोज संविधानाच्या एका कलमाची माहिती व त्याचे सोप्या शब्दांत विवेचन विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना हक्क आणि कर्तव्यांची जाणीव होईल.
या प्रसंगी नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका पल्लवी वाल्हेकर, योगिता बारणे, महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी संगीता बांगर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सेवानिवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे, रवींद्र दुधेकर, शरद जाधव, वसंत साळवी आणि अनिल सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत उपायुक्त अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


