news
Home पिंपरी चिंचवड पती, पत्नी अन् १९ वर्षांच्या मुलीने संपवले जीवन; शाळेतील सहकाऱ्यांमुळे उघडकीस आला दुर्दैवी प्रकार

पती, पत्नी अन् १९ वर्षांच्या मुलीने संपवले जीवन; शाळेतील सहकाऱ्यांमुळे उघडकीस आला दुर्दैवी प्रकार

घटनास्थळावरून पोलिसांकडून सुसाईड नोट हस्तगत; मोरवाडीतील हृदयद्रावक घटनेचा पोलीस करत आहेत सखोल तपास | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडीत आर्थिक विवंचनेतून मल्याळी कुटुंबातील तिघांची आत्महत्या; पोलीस तपास सुरू!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये आर्थिक विवंचनेला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी व खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या १९ वर्षांच्या तरुण मुलीचा समावेश आहे. मृतांमध्ये विनोद पिल्लई (वय ५०), त्यांची पत्नी श्रीजा पिल्लई (वय ४५) आणि मुलगी पूर्णिमा पिल्लई (वय १९) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे केरळ राज्यातील असून ते गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात वास्तव्यास होते. श्रीजा पिल्लई या मोरवाडी येथील एका स्थानिक शाळेत समन्वयक (कोऑर्डिनेटर) म्हणून कार्यरत होत्या.

शनिवारी त्या नेहमीप्रमाणे शाळेत कामावर न आल्याने आणि सहकाऱ्यांनी फोन करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी तात्काळ पिल्लई यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. जवळच राहणाऱ्या नातेवाईकांनी पिल्लई यांच्या घरी जाऊन पाहिले असता घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि घरातील तिघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान विनोद पिल्लई यांचा शनिवारीच मृत्यू झाला, तर पत्नी श्रीजा आणि मुलगी पूर्णिमा या दोघांची रविवारी प्राणज्योत मालवली.

घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट हस्तगत केली आहे. या सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणी आणि विवंचनेमुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आपल्या या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही पिल्लई यांनी पत्रात लिहिल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या संपूर्ण हृदयद्रावक घटनेमुळे मोरवाडी परिसर आणि पिंपरी-चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!