33
कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना ‘समान काम, समान वेतन’ द्या; क्रांती दिनी ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’चा एल्गार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ११ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “९ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांनी भारत सोडून जावे यासाठी ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात झाली आणि हा दिवस क्रांती दिन म्हणून इतिहासजमा झाला. मात्र, आजच्या स्वतंत्र भारतात कंत्राटी कामगारांचे होणारे भीषण शोषण थांबवण्यासाठी आणि संविधानाने दिलेले ‘समान काम, समान वेतन’ हे अधिकार मिळवून देण्यासाठी आपला लढा अविरत सुरूच राहील,” असा ठाम निर्धार राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राज्य अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केला.
क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी पिंपरी येथील संत तुकाराम नगर मधील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सभामंडपात ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’ संघटनेच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जमलेल्या हजारो कामगारांना संबोधित करताना उपस्थितांनी कंत्राटी पद्धतीविरोधात जोरदार आवाज उठवला.
कामगारांच्या सद्यस्थितीवर बोलताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सर्व कारखाने, आस्थापना तसेच शासकीय व निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परमनंट (कायमस्वरूपी) कामगारांच्या जागेवर ठेकेदारांमार्फत कामे दिली जातात. परमनंट कामगाराला ज्या कामासाठी मासिक वेतन ₹४८,०००/- मिळते, त्याच कामासाठी ठेकेदार कंत्राटी कामगाराला महिनाभर ३० दिवस राबवून अवघे ₹१५,०००/- ते ₹१८,०००/- देतात. कंत्राटदार कायदेशीर वेतन खात्यावर जमा करत नाहीत, सुरक्षेची साधने व सवलती देत नाहीत आणि आठवड्याची हक्काची सुट्टीही हिरावून घेतात.
“गेल्या २६ ते ३० वर्षांत आम्ही संविधानाने दिलेले अधिकार मिळवण्यासाठी रस्त्यावरील आंदोलने, ७ वेळा उपोषणे आणि मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय व कामगार न्यायालयात दाद मागितली. परंतु, न्यायालयीन फेऱ्यांमध्ये कामगारांचे आयुष्य जात आहे. तरीही आमचा संविधान, न्यायव्यवस्था आणि सरकारवर पूर्ण विश्वास असून लोकशाहीचे हे स्तंभ कामगारांना नक्कीच न्याय देतील.”— यशवंतभाऊ भोसले, अध्यक्ष (राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य)
या वेळी संघटनेच्या इतर प्रमुख वक्त्यांनीही प्रशासनाच्या कारभारावर व कंत्राटी पद्धतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
सुमित बनसोडे “जोपर्यंत कंत्राटी कामगार पद्धत बंद होत नाही, तोपर्यंत कामगारांचे शोषण थांबणार नाही. कामगारांच्या घरचे मरायला टेकले तरी न्यायव्यवस्था व प्रशासन ढिम्म आहे. कामगारांच्या बाजूने निकाल लागल्यास कामगार देशाच्या हितासाठी सर्वस्व पणाला लावेल.”
विजय भालेराव “गेल्या ३० वर्षांपासून सफाई कामगार कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागूनही पिंपरी-चिंचवड महापालिका अंमलबजावणी करत नाही. वयामुळे एक-एक सफाई कामगार दगावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सफाई कामगारांना ‘समान काम समान वेतन’ तत्त्वावर सेवेत घ्यावे.”
सुनील चिकणे “कोरोनाच्या अत्यंत भीषण काळात आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मृतदेहांचे अंत्यसंस्कार व सर्व विधी पार पाडले. हे सरकार गोरगरीब जनतेचे आहे, मग आम्हाला न्याय कधी मिळणार? सरकारने राजकारणातून बाहेर पडून कोरोना योद्ध्यांच्या आणि कामगारांच्या हिताचा गांभीर्याने विचार करावा.”
४ वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट २०२२ रोजी कामगार कायद्यांच्या संरक्षणासाठी पुणे कामगार कार्यालयासमोर तब्बल १३ दिवस प्राणांतिक उपोषण केले होते, या आठवणीला उजाळा देत, ५ दिवसांवर आलेल्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या तयारीला कामगार संघटना लागली असल्याचे भोसले यांनी सांगितले. “क्रांती दिन चिरायू होवो, वंदे मातरम्, भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

