20
गणराया दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे; सरकार शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास कटिबद्ध – सचिन अहिर
पिंपरी (पुणे) प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी (पुणे): “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सध्या दुष्काळाचे मोठे संकट ओढावले आहे. या संकटामधून सावरण्यासाठी आणि दुष्काळावर यशस्वीपणे मात करण्यासाठी गणरायाने सर्वांना शक्ती द्यावी, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी केली आहे,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केले.
भोसरी येथील सीआयइ ऑटोमेटिव्ह इंडिया लि. (CIE Automotive India Ltd.) कंपनीच्या गणेशोत्सवात गुरुवारी (दि. २४) उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी आमदार महेशदादा लांडगे, शिवसेना उपनेत्या व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, सीआयइ कंपनीचे अधिकारी विनायक कळसकर, निवृत्ती बच्छाव, बाळासाहेब पाटील, प्रशांत शर्मा, कामगार संघटनेचे पदाधिकारी कृष्णदेव थोरात, दीपक अरगडे, सुभाष जमादार, दत्तात्रय धावडे, ज्ञानेश्वर कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आरतीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले की, “राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. केवळ प्रशासकीय अहवालांवर अवलंबून न राहता स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.”
तसेच, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळाबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले असून, अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री यावर योग्य निर्णय जाहीर करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

दुष्काळ विषयावर विशेष अधिवेशन घेण्याबाबत विचारले असता अहिर म्हणाले की, “विशेष अधिवेशन घेण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. पुढील दीड ते दोन महिन्यांत होणाऱ्या नियमित अधिवेशनात लोकप्रतिनिधी या विषयावर आपल्या भावना मांडू शकतील. परंतु त्यापूर्वीच सरकारकडून सर्व परिस्थिती सुरळीत करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवली जाईल. हे नैसर्गिक संकट असून काही ठिकाणी धरणे भरली आहेत, तर काही भागात पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या भूमिकेत सरकार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या वतीने जालना, अमरावती आणि नागपूर येथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. इतर राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनीही चारा छावण्यांसाठी पुढाकार घेतला आहे.
गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावरील बंदीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “गणेशोत्सव हा अत्यंत उत्साहात आणि संस्कृतीचे जतन करत साजरा झाला पाहिजे. मी स्वतः दरवर्षी कामगारांसोबत भक्तिभावाने या उत्सवात सहभागी होतो. आमच्या कामगार संघटना कुठेही डीजे न वापरता पारंपारिक वाद्यांच्या गजरातच गणरायाची आराधना करतात.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
