25
ऐतिहासिक एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनवर शासनाचा घाला; १३४ वर्षांचा समृद्ध वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: पुणे शहराच्या वैभवशाली इतिहासाची आणि समृद्ध जैवविविधतेची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक ‘एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन’वरच शासनाच्या आडमुठ्या व दडपशाही धोरणामुळे गदा आली आहे. न्यायालयाच्या बांधकामासाठी बागेची सुमारे अडीच एकर जागा हस्तांतरित करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू असून, या विघातक निर्णयाविरोधात ‘दि अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ संस्थेने आक्रमक भूमिका घेतली आहे. “विकासाच्या नावाखाली पुण्याच्या हिरव्या फुफ्फुसांवर सिमेंटचा घाव का घातला जात आहे?” असा संतप्त सवाल संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार आणि मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
‘दि अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या स्वायत्त व पर्यावरणवादी संस्थेमार्फत १८९२ सालापासून, म्हणजेच तब्बल १३४ वर्षांपासून या बागेचे आणि येथील शेकडो दुर्मीळ वृक्षांचे जतन अत्यंत निष्ठेने केले जात आहे. विशेष म्हणजे १८९२ पासून आजवर बागेच्या संवर्धनासाठी शासनाकडून एक पैसाही आर्थिक मदत मिळालेली नाही. संस्थेने केवळ लोकसहभाग आणि स्वबळावर हा ऐतिहासिक ठेवा प्राणपणाने जपला आहे. आता जेव्हा हा वारसा फुलतोय, तेव्हा विकासकामांच्या नावाखाली जमीन हिसकावून घेणे अत्यंत संतापजनक असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.
संस्थेने या विशिष्ट जागेवर भविष्यात ‘जैवविविधता पार्क’ (Biodiversity Park) विकसित करण्यासाठी शेकडो दुर्मिळ वृक्ष रोपण करून जपले आहेत. आधीच वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि घटते हरित क्षेत्र यामुळे पुणे शहर त्रस्त आहे. अशा परिस्थितीत शहरातील मध्यवर्ती ‘ग्रीन झोन’ सिमेंटच्या जंगलात बदलल्यास येथील संवेदनशील परिसंस्था कायमची नष्ट होईल. हा निर्णय म्हणजे थेट पुणेकरांच्या आरोग्याशी आणि श्वासाशी खेळ खेळण्यासारखा आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
बागेच्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया बेकायदेशीरपणे सुरू झाल्यापासून संस्थेने वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली आणि तीव्र विरोध दर्शवला. मात्र लोकशाही मूल्यांचा व लोकभावनांचा अनादर करत शासन केवळ दडपशाहीचा मार्ग अवलंबत आहे. लोकभावना आणि पर्यावरणीय प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून प्रक्रिया पुढे नेली जात असल्याने संस्थेने शासनाच्या या मनमानी निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
“एम्प्रेस गार्डन ही केवळ बाग नसून पुण्याच्या इतिहासाची, निसर्गाची आणि पुढील पिढ्यांच्या श्वासाची अमूल्य ठेव आहे. प्रस्तावित अडीच एकर जागा हस्तांतरणाचा काळा निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा. आपल्या या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी समस्त पुणेकर बांधवांनी एकत्र येत लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करावा.”— प्रताप पवार (अध्यक्ष) व सुरेश पिंगळे (मानद सचिव), दि अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
