53
पार्थ गुरव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुखपदी निवड!
पिंपरी (पुणे) प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी (पुणे): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख पदावर पार्थ रमेश गुरव यांची निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी नुकतीच प्रसिद्धीस देण्यात आली असून, त्यात पार्थ गुरव यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना शहर कार्यकारणीत काम करण्याची मोठी संधी देण्यात आल्याचे शिवसेना शहरप्रमुख चेतन पवार यांनी सांगितले. पार्थ गुरव यांची उपशहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
पार्थ गुरव हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील रमेश विठ्ठल गुरव हे गंगानगर परिसरातील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख राहिले आहेत. कौटुंबिक शिवसंस्काराचा वारसा लाभलेले पार्थ हे वैद्यकीय क्षेत्रात उच्चशिक्षित असून चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील ‘सुखकर्ता पॅथॉलॉजी लॅब’चे ते संस्थापक संचालक आहेत.
यापूर्वी त्यांनी शिवसेनेत शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख तसेच पिंपरी विधानसभा समन्वयक अशा विविध संघटनात्मक पदांवर यशस्वीपणे काम केले आहे.
पार्थ गुरव हे केवळ राजकारणातच नव्हे, तर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतही अत्यंत सक्रिय आहेत. गंगानगर प्राधिकरण येथील प्रसिद्ध ‘सिद्धिविनायक मंडळ’ आणि शिवसेना प्रणित ‘जय भवानी प्रतिष्ठान’ (आकुर्डी) या संस्थेचे ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. ‘राष्ट्रीय गुरव समाज महासंघा’चे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष, ‘पिंपरी चिंचवड गुरव समाज संस्थे’चे कार्याध्यक्ष, ‘बारा बलुतेदार महासंघा’चे सदस्य आणि ‘पुणे पॅरामेडिकल असोसिएशन’चे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या २० वर्षांपासून शहर पातळीवर भव्य शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव साजरा करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
पार्थ गुरव यांच्या या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
