news
Home पिंपरी चिंचवड ‘BHMS पदवीवर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळ’; रावेत पोलिसांत तक्रार अर्ज दाखल!

‘BHMS पदवीवर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळ’; रावेत पोलिसांत तक्रार अर्ज दाखल!

युवराजगिरी दाखले यांचा प्रशासनाला इशारा; ७ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

BHMS डॉक्टरकडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा काळा कारभार; रिक्षाचालकाचा बळी – शिवशाही शासन पक्षाचा गंभीर आरोप

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, सप्टेंबर २५, २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

रावेत (पुणे): रावेत येथे केवळ BHMS (होमिओपॅथी) पदवी असताना ‘OJAS MULTISPECIALITY HOSPITAL’ या नावाने बेकायदेशीरपणे ॲलोपॅथी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवले जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बोगस कारभारामुळे आणि वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने एका निष्पाप रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख युवराजगिरी दाखले यांनी केला आहे.

गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते, शिवशाही वाहतूक आघाडी (पिंपरी चिंचवड) चे माजी शहराध्यक्ष तथा रिक्षाचालक अनिल श्रीपत तांबे यांचा रस्ते अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने रावेत येथील OJAS हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटल प्रशासनाकडून वेळेवर योग्य आणि आवश्यक उपचार पुरवले गेले नाहीत. तसेच चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अनिल तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे केवळ वैद्यकीय हलगर्जीपणा नसून गोरगरीब रुग्णांची चाललेली आर्थिक लूट आणि त्यांच्या जीवाशी थेट खेळ चालू असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (MMC) नियमांनुसार, BHMS (होमिओपॅथी) पदवीधारक डॉक्टरांना ॲलोपॅथीचे उपचार करणे, सलाईन लावणे, हाय-डोस इंजेक्शन्स व अँटिबायोटिक्स देणे, तसेच रुग्णांना दाखल करून शस्त्रक्रिया (सर्जरी) करण्यास पूर्णपणे बंदी आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील ‘क्रॉस पॅथी’ प्रॅक्टिसला गंभीर गुन्हा ठरवले आहे. तरीही रावेतसारख्या शहरात नियमांना पायदळी तुडवून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आज रावेत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शिवशाही शासन पक्षाच्या वतीने निवेदन देऊन  प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.  OJAS हॉस्पिटलसह रावेत परिसरातील सर्व BHMS डिग्रीवर चालणाऱ्या हॉस्पिटल्सची आणि क्लिनिक्सची तात्काळ सखोल तपासणी करण्यात यावी.  संबंधित डॉक्टरांची शैक्षणिक कागदपत्रे, मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन आणि क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ॲक्टनुसार आवश्यक असलेल्या परवान्यांची (Registration) कायदेशीर तपासणी व्हावी.  तपासणीदरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अधिनियम १९६१’ अन्वये तात्काळ कठोर गुन्हा दाखल करून संबंधित हॉस्पिटल्स सील करण्यात यावीत.

पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जर पुढील ७ दिवसांत संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर शिवशाही शासन पक्ष व मातंग समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!