42
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा; ६ महिन्यांत पेन्शन देण्याचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे निर्देश!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) हजारो सेवकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) सर्व लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
माहितीनुसार, माननीय उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेल्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना येत्या ६ महिन्यांच्या कालावधीत निवृत्ती वेतनाचे लाभ अदा करावेत, असे स्पष्ट निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती तथा पीएमपीएलचे संचालक अभिषेक बारणे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला दिले आहेत.
या महत्त्वपूर्ण प्रकरणात स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी पीएमपीएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना (CMD) अधिकृत पत्र पाठवून न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. ५६२७/२०१३ वर दिलेल्या निर्णयानुसार ६ महिन्यांच्या विहित कालावधीत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशा कडक सूचना त्यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.

पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतनाचे लाभ मिळतात. मात्र, पीएमपीएमएलचे कर्मचारी या लाभांपासून वंचित राहिल्याने निवृत्तीनंतर त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटे ओढवत होती. २ मे २०१३ औद्योगिक न्यायालय (पुणे) यांनी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे आदेश सर्वप्रथम दिले. या निकालाविरुद्ध पीएमपीएमएल प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने प्रशासनाची याचिका फेटाळून लावत कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि ६ महिन्यांच्या आत निवृत्ती वेतनाचे लाभ वितरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
उच्च न्यायालयाचा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागल्यानंतर आणि सभापती अभिषेक बारणे यांनी प्रशासनाकडे ६ महिन्यांत कार्यवाहीचा पत्राद्वारे पाठपुरावा सुरू केल्याचे समजताच, निवृत्त कर्मचाऱ्यांनी महापालिकेत एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सभापती अभिषेक बारणे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भावूक वातावरणात नागरी सत्कार केला व आभार मानले.
“पीएमपीएलचे कर्मचारी हे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा आहेत. महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पीएमपीएल कर्मचाऱ्यांनाही राज्य शासनाच्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळणे हा त्यांचा न्याय्य हक्क होता. २९ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर मिळालेला हा विजय अत्यंत ऐतिहासिक आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना पेन्शनचे लाभ मिळालेच पाहिजेत, यासाठी मी PMPML प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”— अभिषेक बारणे (सभापती – स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
