51
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक संवाद; ताथवडे-काळेवाडी परिसरात विकासकामांना गती देण्याचा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा निर्धार!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “नागरिकांचा सहभाग, लोकप्रतिनिधींचा पुढाकार आणि विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी” या त्रिसूत्रीतूनच प्रभागाचा सर्वांगीण विकास साध्य होतो, हा विश्वास सार्थ ठरवत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट संवाद साधला आहे. पुरंदर तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रभागातील विविध प्रलंबित नागरी समस्यांवर आणि विकासकामांवर स्थानिक रहिवाशांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविताताई खुळे, नगरसेविका अर्चनाताई तापकीर आणि माजी स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान स्थानिक रहिवाशांनी प्रभागातील भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या. मुख्य विजेच्या तारा (मेन लाईट वायर), डीपी आणि विद्युत खांबांची दुरुस्ती करणे, नवीन वीज खांब रोवणे व नवीन सुरक्षित केबल वायर बसविणे, रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणे, कचरा गाडी दररोज नियमितपणे वेळेवर येण्यासंदर्भात नियोजन करणे.

नागरिकांच्या सर्व समस्या अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि उपस्थित नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेतली. प्रभागातील विजेच्या खांबांची दुरुस्ती, नवीन डीपी आणि वायरिंगचे काम येत्या दोन महिन्यांत प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे ठाम आश्वासन यावेळी देण्यात आले.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी नेहमीच अग्रभागी राहून समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या तडफदार भूमिकेबद्दल पुरंदर तरुण मित्र मंडळ आणि परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या वतीने नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविताताई खुळे व नगरसेविका अर्चनाताई तापकीर यांचा भावूक वातावरणात नागरी सत्कार करून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी सतत कार्यरत असणारे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी, “नागरिकांच्या अडचणी दूर करून प्रभागात विकासाचा प्रकाश पसरवणे ही माझी जनसेवक म्हणून पहिली जबाबदारी आहे,” असा पुनरुच्चार केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
