news
Home पिंपरी चिंचवड छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनचालकांची कसरत; खड्डा चुकवताना मोठ्या अपघाताची टांगती तलवार!

छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनचालकांची कसरत; खड्डा चुकवताना मोठ्या अपघाताची टांगती तलवार!

महापालिकेने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा अरुण चाबुकस्वार यांचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीषण खड्डा; अपघाताचा मोठा धोका, महापालिका प्रशासन कधी जगे होणार?

पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

 

रहाटणी:  शहराला खड्डेमुक्त करण्याचा आणि रस्ते वाहतूक सुरक्षित करण्याचा ठाम संकल्प महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला असताना, दुसरीकडे मात्र ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील रस्ते प्रशासकीय बेफिकिरीमुळे खड्डेमय झाले आहेत. रहाटणी येथील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातच रस्त्यावर एक अत्यंत मोठा आणि धोकादायक खड्डा पडल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रहाटणी आणि पिंपळे सौदागर जोडणाऱ्या या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवसरात्र हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. चौकातील मुख्य मार्गावरच हा मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी मोठा धोका: रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा अपुरा प्रकाश आणि खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अचानक ब्रेकमुळे भीषण अपघाताची शक्यता: खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकीस्वार अचानक ब्रेक मारतात, ज्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन मोठा अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

या गंभीर समस्येकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि ‘स्मार्ट सिटी’ प्रशासनाच्या बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यावर तीव्र संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांनी प्रशासकीय सुस्तावलेपणावर जोरदार निशाणा साधला आहे.
“आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहर खड्डेमुक्त करण्याचे जाहीर केले आहे, पण स्मार्ट सिटीच्या या मुख्य चौकात पडलेला खड्डा प्रशासनाला दिसत नाही का? एखादा गंभीर अपघात घडल्यानंतर किंवा नागरिकांचा बळी गेल्यावरच महापालिका प्रशासन खडबडून जागे होणार आहे का? कोणत्याही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ या खड्ड्याची पाहणी करून तो बुजवावा आणि रस्ता सुस्थितीत करावा.”
अरुण चाबुकस्वार (सामाजिक कार्यकर्ते)

नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवून प्रशासनाने विलंब न करता प्राधान्यक्रमाने या खड्ड्याची दुरुस्ती करावी, अन्यथा महापालिकेच्या नाकर्तेपणाविरोधात नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!